अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपली ‘कटय़ार’ रुतविणाऱ्या अभिनेता सुबोध भावे याचा वेगळा ‘भावे’ प्रयोग आता ‘ती फुलराणी’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकासमोर येणार आहे. ‘ती फुलराणी’ नाटकातील ‘प्रा. जहागीरदार’ ही भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. ही भूमिका माझ्यासाठी आव्हान असून भूमिकेला मी माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे सुबोध भावे याने ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले.
जॉर्ज बनॉर्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियनम’ या नाटकावर आधारित ‘माय फेअर लेडी’ हा चित्रपट मी पाहिला होता. ‘ती फुलराणी’ नाटकात मला भूमिका करायची संधी मिळाली नाही. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा केली तेव्हा मी लगेचच हो म्हटले, भूमिका नाकारायचे काही कारणच नव्हते, असेही सुबोध म्हणाला.
मूळ ‘ती फुलराणी’तील सतीश दुभाषी यांनी आणि नंतर संजय मोने यांनी रंगविलेला ‘प्रा. जहागीरदार’ मी पाहिलेला नाही. अविनाश नारकर यांचा ‘प्रा. जहागीरदार’ पाहिला आहे. पण चित्रपटातील ‘प्रा. जहागीरदार’ साकार करताना नाटक काय होते, त्यात ही भूमिका कोणी व कशी सादर केली होती, हे विसरून जाऊन चित्रपटातील ‘प्रा. जहागीरदार’ मी माझ्या पद्धतीने रंगविण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमे पूर्णपणे वेगळी आहेत. आपण ‘नाटक’ नव्हे तर ‘चित्रपट’ करत आहोत याची पूर्ण जाणीव ठेवून मी ही भूमिका करणार आहे. माझा हा ‘प्रा. जहागीरदार’ कोणाहीसारखा नसेल तर तो माझा असेल, असेही त्याने सांगितले.
‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित याच नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करतानाही आपण हे भान जपले होते. नाटक व चित्रपट निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. चित्रपटात कॅमेरा बोलत असतो. चित्रपटाची संहिता माझ्याकडे आल्यानंतर, तिचे वाचन व अभ्यास करून ‘प्रा. जहागीरदार’ कसा साकारायचा ते आपण ठरवू, अशी माहितीही सुबोधने दिली. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’ या चरित्र भूमिकांनंतर ‘कटय़ार’ चित्रपटातील ‘सदाशिव’ आणि आता ‘ती फुलराणी’ नाटकातील ‘प्रा. जहागीरदार’ सुबोध साकारात आहे. त्याचा हा ‘प्राध्यापक’ क सा असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2016 रोजी प्रकाशित
‘ती फुलराणी’चा ‘भावे’प्रयोग
जॉर्ज बनॉर्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियनम’ या नाटकावर आधारित ‘माय फेअर लेडी’ हा चित्रपट मी पाहिला होता.

First published on: 06-04-2016 at 00:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professor jagirdar role challenge for me say subodh bhave