बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालण्यासाठी हिरोइनसोबत हिरोच हवाच, हे समीकरण राणीनं कित्येक वर्षांपूर्वी खोडून काढलं. ‘नो वन किल जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ अशा दमदार कथानकाच्या जोरावर तिनं अभिनेत्याविनाच चित्रपट सुपरहिट करून दाखवले. त्यानंतर आता ती लवकरच ‘मर्दानी 2’ या चित्रपटामध्ये झळकणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘मर्दानी 2’ या चित्रपटामध्ये राणी इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी राव ही भूमिका साकारत आहे. प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता हा चित्रपट कोटामध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या सत्यघटनेवर आधारित आहे. हा ट्रेलर यश राज फिल्म्सने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला असून “ती परत आली आहे. ती थांबणार नाही. ही आहे शिवानी शिवाजी राव”, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये राणी खऱ्या अर्थाने मर्दानी रुपात पाहायला मिळत आहे. तिचा लूक आणि स्मार्टनेस तिच्या भूमिकेसाठी अत्यंत साजेसा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपी पुत्रन करत असून निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. यश राज फिल्म्सअंतर्गत चित्रीत होणारा हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.