हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी मोलाचं योगदान दिलं आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता विनोद खन्ना. बॉलिवूडचा ‘अमर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांची आज जयंती. विनोदजी आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वामुळे ते कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील.
खलनायकी भूमिकांना वेगळ्याच पद्धतीने रुपेरी पडद्यावर मांडण्याची सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला होता. भारत- पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. त्यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर त्यांनी सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटसृष्टीत ते खलनायकी भूमिकांमध्ये बरेच रुळले. त्यानंतर १९७१ मध्ये त्यांनी ‘हम तूम और वो’ चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. विनोदजींनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर- अकबर- अँथनी’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
१९८२ मध्ये आपल्या कारकिर्दीत परमोच्च शिखरावर असतानाच खन्ना यांनी ओशो रजनीश या गुरुंचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर थेट पाच वर्षांनी त्यांनी चित्रपसृष्टीत पुनरागमन केलं. अभिनयासोबतच ते राजकारणातही बरेच सक्रिय होते. १९९७ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पंजाबमधील गुरुदासपुर भागात भाजपतर्फे निवडणूक लढवत ते खासदार पदावर निवडून आले होते.