आज आदर्श मूल्यं, संस्कार वगैरे गोष्टींना काही अर्थ उरलेला नाही. तुम्ही बऱ्या-वाईट कशाही मार्गाने सत्ता, पैसा, प्रसिद्धी मिळवा; आपसूक तुम्हाला समाजात मान-मान्यता मिळते. त्याकरता वाट्टेल ते करून एखादं सत्तास्थान मिळवणं महत्त्वाचं. आपले बहुतेक राजकीय नेते हे याचं जितंजागतं उदाहरण होय. कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवायची; मग त्यातून आपसूकच पैसा, प्रसिद्धी व सामाजिक प्रतिष्ठा तुमच्याकडे चालून येते, हे ढळढळीतपणे समोर घडताना पाहत असल्याने ‘यथा राजा तथा प्रजा’ न्यायाने आता प्रत्येकजण येनकेन प्रकारेण सत्ता मिळवायचा (किंवा ते जमलं नाही तर किमान सत्ताकेंद्राशी जवळीक साधण्याचा) प्रयत्न करताना दिसतो. आपण ज्या पदावर आहोत त्याचा लाभ उठवून पुढच्या पिढय़ांचं- किंवा किमान आपलं आयुष्य तरी ऐषोरामात आणि चैनीत जाईल याची व्यवस्था करताना माणसं दिसतात. हे करताना आपण काही गैर करतो आहोत, याची चाड ना त्या व्यक्तीला असत, ना त्याच्या कुटुंबाला, ना समाजाला! कारण आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात तत्त्वं, मूल्यं यांनी माणसाचं पोट भरत नाही, यावर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. पैसा हेच यशाचे परिमाण ठरू लागले आहे. आणि त्या जोरावर काहीही ‘मॅनेज’ करता येते, हे प्रत्यक्ष आपण आजूबाजूला पाहतो आहोत. याच्या उलट मूल्यं जोपासणारी माणसं मात्र मागे पडताना दिसतात. हे सार्वत्रिक चित्र असताना सगळ्या समाजालाच भ्रष्टाचाराची कीड लागली असेल तर त्यात नवल नाही. ऱ्हासाप्रत निघालेला समाज हे याचंच फलित आहे. प्रवीण शांतारामलिखित, सुदेश म्हशीलकर दिग्दर्शित ‘टॉस’ नाटकाचा विषय हाच आहे. टॉस उडवून छापा आला काय किंवा काटा आला काय, जीत आपलीच- असं म्हणणं हाच जर का आयुष्याचा फंडा असेल, तर अशांकडून मूल्यांची अपेक्षा ठेवणं व्यर्थच.
‘टॉस’मधल्या अविनाशच्या कुटुंबात हाच तिढा निर्माण झालेला आहे. बायको, दोन कॉलेजवयीन मुलं, आई-वडील असं त्याचं छान सुखी कुटुंब आहे. सततच्या दौऱ्यांच्या नोकरीपायी तो १५-१५ दिवस घराबाहेर असतो. सुलभासारखी शिक्षिका असलेली कर्तव्यदक्ष बायको असल्यानं त्याला घरची फारशी काळजी नसते. घर व नोकरी या दोन्ही आघाडय़ा सुलभा यशस्वीपणे सांभाळते. मुलांना वाढवण्यासंदर्भात उभयतांमध्ये मतभेद असले तरी त्याबाबतीत तोल सांभाळला जाईल याकडे सुलभाचा कटाक्ष आहे.
हे सुखी कुटुंबाचं चित्र अकस्मात विस्कटतं. सुलभाच्या शाळेतील एक विधुर शिक्षक देशपांडे तिच्याशी गैरवर्तन करू लागतात तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसतो. शाळेतला हा प्रकार घरी न सांगता ती मनातच दडपण्याचा प्रयत्न करते, परंतु ते असह्य़ झाल्यावर तिचा उद्रेक होतो. अविनाशला हे कळताच आपले पोलिसांतले कॉन्टॅक्ट्स वापरून तो देशपांडेना योग्य ती शिक्षा देतो. पण हे प्रकरण एवढय़ावरच संपवायचं सोडून आईशी गैरवर्तन केल्याचा संताप येऊन तेजस देशपांडेंना गाठून त्यांना बेदम मारहाण करतो. प्रकरण पोलिसांत जातं. एवढंच घडतं तर अविनाशनं ते प्रकरण दाबून टाकलं असतं. परंतु देशपांडेंना चोप देऊन येत असताना वाटेत एका बारमध्ये राजकारण्यांच्या नादी लागून मतदारांना लाच देताना तेजस पकडला जातो. अविनाश कसाबसा त्याला यातून सोडवतो. हे सारं सुलभाला बिलकूल मंजूर नसतं. मुलाचं गैरवर्तन पाठीशी घालण्याला तिचा सख्त विरोध असतो. त्यानं केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा त्यानं भोगायला हवी, असं तिचं मत. तर अविनाशच्या मते, मुलाचा गुन्हा इतका काही गंभीर नाही.. तेवढय़ाकरता त्याचं आयुष्य बरबाद करण्यात काय हशील? आणि मग आपले कॉन्टॅक्ट्स काय उपयोगाचे?
सुलभाला हे सगळं बिलकूल मंजूर नसतानाही घरच्यांच्या दबावापुढे तिला नमावं लागतं. अविनाश पगाराव्यतिरिक्त वरकमाई करतो, लोकांची कामं करून देण्यासाठी पैसे घेतो, हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती त्याला कडाडून विरोध करते. परंतु यावर अविनाशचं म्हणणं असतं की- ‘मी काही कुणावर जबरदस्ती करत नाही. काम झाल्याबद्दल कुणी राजीखुशीनं पैसे देत असतील तर मी ते घेतो. यात गैर काय?’
..आणि एके दिवशी सुलभावर बॉम्बच पडतो. ती आपल्या शाळेची ट्रिप घेऊन गेलेली असताना त्या ठिकाणी अविनाश कुणा तरुण मुलीशी चाळे करताना तिच्या दृष्टीस पडतो आणि तिचा स्फोट होतो. ज्याच्यावर आजवर आपण आंधळेपणाने विश्वास टाकला, ज्याच्यावर निरतिशय प्रेम केलं, त्या अविनाशनं तिच्या विश्वासाला तडा दिला होता. आपलं प्रकरण उघडकीस आल्यावर अविनाशनं निल्र्लज्जपणे ‘तुला हे सारं निमुटपणे स्वीकारावं लागेल, अन्यथा घर सोडावं लागेल,’ असं सुलभाला सांगितल्यावर तर तिची तळपायाची आग मस्तकातच जाते. ती घर सोडून जायचा निर्णय घेते. आजवर ज्या तत्त्वांची आपण पाठराखण केली, ती या घरात साफ पायदळी तुडवली जाताहेत, हे तिला सहन होणंच शक्य नसतं.
..काय होतं पुढे? मुलं आणि सासू-सासरे तरी तिला साथ देतात का? की तीच व्यवहारी विचार करून आपल्या तत्त्वांना मुरड घालते? या प्रश्नांची उत्तरं नाटकातच शोधणं उत्तम.
लेखक प्रवीण शांताराम यांनी वर्तमान वास्तव आणि आदर्श मूल्यं यांच्यातला विकट संघर्ष या नाटकात मांडलेला आहे. नाटकाचे दोन शेवटही त्यांनी योजले आहेत. एक- आदर्शवादाची कास धरणारा. आणि दुसरा- आजच्या भयाण वास्तवाचं दर्शन घडवणारा.. मूल्यांचा पराभव अधोरेखित करणारा. नाटकाच्या रचनेत लेखकाने धक्कातंत्राचा वापर केला आहे. नाटकात एकामागोमाग एक धक्कादायक घटना घडतात. मात्र, त्यांची पडछाया पुढच्या प्रसंगांत अभावानेच आढळते. त्यातून नाटकाचं बेतलेपण लक्षात येतं. सुलभाचा अपवाद करता सखोल व्यक्तिचित्रणाच्या भानगडीत न पडता लेखकाने घटनांवर भर दिला आहे. त्यांतलं नाटय़ ठळक करण्यात त्यांना जास्त रस दिसतो. परंतु यामुळे झालं काय, की नाटक कृतक होत गेलं आहे. यातली समस्या शंभर टक्के आजची आहे, वर्तमानातलं वास्तव उभं करणारी आहे. परंतु ज्या प्रकारे ती मांडली गेली आहे, त्यात खोलात शिरायचं लेखकानं नाकारल्याचं स्पष्ट जाणवतं. प्रत्येक गोष्टीला पुढचे-मागचे संदर्भ असतात. त्याखेरीज तिला विश्वासार्हता प्राप्त होत नाही. ‘टॉस’मध्ये नेमकी याचीच उणीव भासते. प्रयोगाच्या ओघात सर्वसामान्य प्रेक्षकांना हे जाणवणार नाही कदाचित; परंतु चिकित्सकांना मात्र ते खटकल्याविना राहत नाही. प्रेक्षकानुनयाचा धागा नाटकात सतत जाणवत राहतो. नानीच्या हास्य-क्लबच्या गमती त्यात मोडतात. मात्र हेही खरंय, की मधेच नाटक आपल्या मूळ हेतूपाशी येतं तेव्हा ते सच्चं वाटू लागतं.
दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर यांनी संहितेबरहुकूम प्रयोग बसवला आहे. त्यातल्या कृतकतेसह! त्यांनी नादुरूस्त जुन्या रेडिओचा डिव्हाइस म्हणून केलेला वापर गमतीशीर असला, तरी नाटकातील गंभीर आशयाला ते मारक वाटतं. नाटकाचे बेतलेपणही ते जाहीर करतं. नाटकात दाखवलेले दोन शेवट हे नाटककर्त्यांना आपली भूमिका ठोसपणे मांडायची नाहीए, हेच दर्शवतात. सुनील देवळेकर यांचं नेपथ्य व प्रकाशयोजना नाटय़ाशय गडद करते. परिक्षित भातखंडेंचं संगीत नाटकाची मागणी पुरवणारं आहे. प्रकाश निमकर- मास्टर बळवंत यांची वेशभूषा पात्रांना बाह्य़ व्यक्तिमत्त्व देते.
संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी गृहकर्तव्यदक्ष आणि तत्त्वनिष्ठ सुलभा मूर्तिमंत उभी केली आहे. त्यांच्या वावरण्यातून, वर्तन-व्यवहारातून सुलभाची कणखरता, मूल्यांबद्दलचा तिचा आग्रह आणि त्यासाठीची किंमत मोजायचा दृढनिश्चय दिसून येतो. विघ्नेश जोशी यांनी आजच्या मूल्यभ्रष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करणारा अविनाश त्याच्या निलाजरेपणासकट यथार्थपणे साकारला आहे. एकीकडे कुटुंबवत्सल गृहस्थ आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराला सहज शिष्टाचार मानणारा व्यवहारवादी माणूस अशी त्याची दुहेरी रूपं त्यांनी तितक्याच सहजतेनं दाखवली आहेत. पूजा अजिंक्य यांची नानी आपल्या वाटय़ाचे हशे चोख वसूल करते. सुनील गोडबोलेंनी पापभीरू व गमत्ये आप्पा छान वठवले आहेत. तेजस डोंगरे आणि रेणुका भिडे यांनीही चोख साथ केली आहे.
