शिक्षण ही मूलभूत गरज आहे, मात्र शिक्षणाचे माध्यम कोणते हवे ही काळाच्या ओघाने बदलत चाललेली विचारधारा आहे. आपल्या पाल्याला चांगले आणि उच्च दर्जाचे शिक्षण इंग्रजी भाषेतच मिळेल अशी एकूण विचारधारा असणाऱ्या पालकांशी नव्याने संवाद साधणारा चित्रपट म्हणून नितीन नंदन दिग्दर्शित ‘बालभारती’ या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. २ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, अभिजीत खांडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याबरोबर ‘लोकसत्ता’च्या  कार्यालयात गप्पा रंगल्या.

चांगली शाळा शिक्षकांमुळे घडते

चित्रपट करण्याआधी तो शिक्षणावरच करायचा असे ठरले नव्हते. बऱ्याचदा आपल्या पाल्यांना कोणत्या शाळेत घालायचे यावरून नातेवाईकांमध्ये कधीही न संपणारी चर्चा रंगते. मात्र, आपल्या पाल्याला शिक्षणासाठी कोणत्या शाळेत घालायचे यापेक्षा त्या मुलांचे पालक आपल्या मुलांच्या योग्य शिक्षणासाठी काय मेहनत आणि धडपड करतात?, हे मला चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवायचे होते. परंतु चांगली शाळा कोणती हे कसे ठरवायचे? तर त्या शाळांमध्ये शिक्षक कसे आहेत यावरून त्या शाळेबदद्लचा चांगल्या – वाईटाचा निर्णय घ्यावा. चांगली शाळा ही शिक्षकांमुळेच घडते, असे प्रामाणिक मत नितीन नंदन यांनी मांडले.

विनोद हा माझा बाज पण..

आजवर अभिनेता सिद्धार्थ जाधवला प्रेक्षकांनी विनोदी भूमिकेत काम करताना पाहिले आहे. मात्र, या चित्रपटात त्याने वडिलांची भूमिका साकारली आहे जी एका अंगाने जरी विनोदी असली तरी मोठय़ा जबाबदारीची भूमिका आहे. याबद्दल सांगताना सिद्धार्थ म्हणतो, ‘विनोद हा माझा बाज आहे, पण विनोदाबरोबरच अभिनयाचे जे विविध अंग आहेत ते बालभारती चित्रपटामुळे आणि दिग्दर्शक नितीन नंदन यांच्यामुळे मला अनुभवायला मिळाले, कारण दिग्दर्शकाचे म्हणणेच हे आहे की तुम्ही आतापर्यंत किती, काय मोठे काम केले आहे याच्याशी मला देणेघेणे नाही. तुम्ही या चित्रपटात सहज-नैसर्गिक पध्दतीने काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार या भूमिकेचा विचार करताना मी माझ्या वडिलांचे आणि माझे नाते कसे होते? शिवाय बाबा म्हणून मी कसा आहे?, या दोहोंची सांगड घालत ही राहूल देसाईची व्यक्तिरेखा साकारली आहे.’

कलाकार रमले जुन्या आठवणींत

या चित्रपटात वडील आणि मुलाचे नाते केंद्रस्थानी आहे. आत्ताचे वडील हे मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करण्यासाठी धडपडतात. वडील-मुलाच्या मैत्रीच्या नात्याबद्दल अधिक सांगताना सिध्दार्थ म्हणाला, माझ्या घरी वडील एकटे कमावते आणि शिक्षण घेणारी अपत्य तीन. त्यामुळे मानसिक, आर्थिक, शारीरिक खस्ता खात त्यांनी आम्हा तिन्ही भावंडाना शिकवले, पण आम्ही तुझ्यासाठी एवढय़ा खस्ता खातो आहोत हे कधी त्यांनी बोलून दाखवले नाही. आपण मात्र कळत-नकळत आपल्या मुलांकडून अपेक्षा करतो हे चुकीचे आहे. या चित्रपटात बाप म्हणून मी हरलो असे सांगत माझी व्यक्तिरेखा स्वत:च्या कानाखाली मारून घेते असा प्रसंग आहे. वाटली. अभिजीतनेही यावेळी वडिलांची नोकरी आणि बदल्यांमुळे त्याचे शिक्षण बीड, परभणी, अहमदनगर अशा ग्रामीण भागांमध्ये कसे गेले आणि केवळ मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी हट्टाने वडिलांनी नाशिकला कायमस्वरूपाची बदली कशी घेतली, याची आठवण सांगितली. ‘इंग्रजी भाषेचा न्यूनगंड हा आजही मोठा विषय आहे. आपल्याकडे अजूनही भाषा हे संवादाचे माध्यम न मानता तुम्हाला कोणत्या भाषेत संवाद साधता येतो यावरून तुमचा समाजातला दर्जा ठरवला जातो, या कटू वास्तवावरही त्याने बोट ठेवले. 

..आणि मी अभिनय क्षेत्रात आले

हवाईदलात जायची इच्छा होती म्हणून नंदिताने आवड नसतानाही विज्ञान विषयात शिक्षण घेतले. इतकेच नाही तर रुपारेल महाविद्यालयात एनसीसीत प्रवेश घेतला, मात्र काही कारणाने तिचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला.  कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत असताना ‘अविष्कार’ या प्रायोगिक नाटय़संस्थेशी ओळख झाली आणि तिने प्रायोगिक नाटक करायला सुरुवात केली. या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देत नंदिताने तिची आई रेशिनग ऑफिसमध्ये नोकरीला होती. आणि तिला आपल्या मुलीने सतत काहीतरी करत राहावे किंवा कला आत्मसात करावी असे वाटायचे. आपण शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही असा आईचा अट्टहास होता आणि तिने हट्टाने करून घेतलेल्या गोष्टींचा आज अभिनय क्षेत्रात काम करताना खऱ्या अर्थाने फायदा होतो आहे, अशी कबुली दिली. 

रुपारेलने शिस्त लावली

‘महाविद्यालयात आमच्या एका नाटकाचे कडक दिग्दर्शक होते दीपक राजाध्यक्ष. त्यांची शिस्त म्हणजे शिस्त. आणि आदल्या दिवशी आम्ही सगळय़ा मुलांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे दिग्दर्शकांनी आम्हाला सांगितले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता नाटकाच्या तालमीला सुरुवात झालीच पाहिजे. आम्ही सर्व मुले दुसऱ्या दिवशी वेळेच्या आधीच तालमीसाठी हजर झालो. त्यावेळी नाटकात जी गाणी वापरली जायची त्याचा रेकॉर्डर सिद्धार्थकडे होता. आणि ८ वाजून गेले पण सिद्धार्थचा पत्ताच नाही. आम्हा सगळय़ांना दरदरून घाम फुटला. आणि साधारण ९ च्या सुमारास तालमीच्या वर्गाचा दरवाजा वाजला आणि दारात झोपेतूनच उठून आलेला सिद्धार्थ रेकॉर्डर घेऊन उभा होता. त्या दिवशी सिद्धार्थच्या नजरेतील ती भीती आठवली की अंगाला फुटलेल्या घामासोबत मनात प्रचंड हसायलाही येते’, असे सांगत रुपारेलने शिस्त लावल्याचे नंदिताने सांगितले.

कलाकारांच्या शाळेतील कुरापती

‘माझे पाठांतर चांगले असल्यामुळे विज्ञानाच्या प्रयोग प्रदर्शनावेळी मला प्रयोगाबद्दल माहिती द्यायला उभे करायचे. तर कधीतरी सापांबद्दल माहिती द्यायची असेल तर तेही मी चोख पाठ करून साप चावल्यावर तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे कसे ओळखायचे याबद्दल गमतीशीर माहिती द्यायचो’, असे विनोदी किस्से सिद्धार्थने सांगितले. तर अभिजितने ओल्या आणि सुक्या कचऱ्यातून विजेचा दिवा कसा पेटतो हे दाखवणाऱ्या फसलेल्या प्रयोगाची मजेशीर आठवण सांगितली. शालेय जीवनात सहज करून बघूयात म्हणून केलेल्या वकृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, खेळ, नाच अशा सर्व स्पर्धामधला सहभाग व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वाचा ठरला. त्यावेळी त्याचा पुरेपूर आनंद घेतला होता, असेही या कलाकारांनी सांगितले.

मराठी चित्रपट महत्त्वाचे..

मराठी कलाकार आता हिंदी चित्रपटांसह वेब मालिकांमध्येही विविध भूमिका साकारताना दिसतात. मात्र, मराठी भाषेशिवाय इतर भाषांमध्ये केलेले चित्रपट म्हणजे माझ्यासाठी पुरवणी आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीत करत असलेले काम म्हणजे माझी उत्तरपत्रिका असल्याचे सिद्धार्थ सांगतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची स्वप्ने फार मोठी असतात आणि ते मी स्वत: अनुभवले असल्यामुळे त्या स्वप्नांचा पाठलाग करत मी आज माझे स्थान निर्माण करू शकलो, असे तो म्हणतो. भूतकाळात अनुभवलेल्या वाईट आणि नकारात्मक घटनांमधून सकारात्मक गोष्टी शिकत मेहनतीने सतत पुढे जात राहिल्यानेच मराठीबरोबरच इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा आत्मविश्वास वाढत गेल्याचे सिध्दार्थ आणि अभिजीतने सांगितले. 

मातृभाषेत प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावे की न घ्यावे, हा व्यक्तिसापेक्ष विषय आहे. हा विषय केंद्रस्थानी घेऊन चित्रपट करताना त्याचा आशय  हा पालकांना, मुलांना आणि समाजाला भिडणारा असावा मात्र तो मनोरंजक पध्दतीनेच त्यांच्यापर्यंत पोहोचेल हे पक्के ठरवून त्या पध्दतीने बालभारती चित्रपट केला आहे. प्रत्येक कुटुंबाने मुलांसह हा चित्रपट पाहायला हवा, असे आवाहन करत ‘बालभारती’च्या टीमने या गप्पांचा समारोप केला.