अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर रियाला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच धमकीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत रियाने उत्तर दिलं आहे.

‘मला मारेकरी म्हटलं.. मी गप्प बसले, अर्वाच्च भाषेत मला शिवीगाळ केली.. मी गप्प बसले, मला फायदा उचलणारी म्हटलं.. मी गप्प बसले. पण मी गप्प बसले म्हणून, मी आत्महत्या केली नाही म्हणून माझा बलात्कार किंवा हत्या करण्याचा कोणता अधिकार तुम्हाला मिळतो? तू जे म्हणालीस त्या गोष्टीची गंभीरता तरी तुला ठाऊक आहे का? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणाचाही, मी पुनरुच्चार करते की कोणाचाही अशाप्रकारे छळ होऊ नये. आता पुरे झालं’, असं लिहित रियाने सायबर क्राइम सेलला कारवाईची विनंती केली आहे.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र तो नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास करत असून त्यांनी आतापर्यंत तीसहून अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये रियाचाही समावेश आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं.