गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो तान्हाजींची भूमिका साकारणार असून सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका वठवणार आहे. जेव्हा पासून तान्हाजी चित्रपटाची घोषणा झाली आहे तेव्हा पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लगाले आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अजय देवगणला छत्रपती शिवाजी महाराजांचा बायोपिक आला तर त्यात महाराजांची भूमिका कोणी साकारावी असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजयने लागलीच अभिनेता रितेश देशमुखचे नाव घेतले. कारण रितेश गेल्या काही दिवसांपासूनच शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर काम करत असल्याचा खुलासा केला. मात्र त्याने चित्रपटासंबंधी आणखी माहिती देणे टाळले.
‘तान्हाजी’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक ओम राऊतने केली असून चित्रपटात मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वठवणार आहेत. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि सैफही जोडी तब्बल १३ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.