१९५९ साली गाजलेल्या नानावटी प्रकरणावर आता चित्रपट का काढावासा वाटला असेल? त्या काळी एक कर्तव्यदक्ष नौदल अधिकारी आपल्या पत्नीला फसवणाऱ्या तिच्या प्रियकराची हत्या करतो आणि तिला न्याय मिळवून देतो. आपल्या पत्नीचे दुसऱ्याशी संबंध होते तरीही तिला समजून घेऊन, तिला स्वीकारत पती-पत्नीच्या नात्याचा नवा (आदर्श?) पायंडा घालतो, इतका संकुचित अर्थ या चित्रपटामागे नसावा. निर्मात्यांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकाने कितीही नाकारले तरी हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नानावटी प्रकरणावरच बेतलेला आहे. पण त्याला ओढूनताणून देशभक्तीचा मुलामा देण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास न समजण्यापलीकडचा आहे.
कमांडर नानावीटींच्या खटल्याशिवाय आणखी तीन-चार घटना एकत्र करून या चित्रपटाची कथा बेतण्यात आली आहे. त्यामुळे रुस्तुम पावरीच्या रूपाने पुन्हा एकदा देशी हिरोला समोर आणण्यासाठी त्याला युद्धनौकेच्या खरेदी-विक्री व्यवहाराची जोडकथा देत एकाच वेळी संरक्षण खात्याच्या गरकारभारावर बोट ठेवण्याचा आणि रुस्तुमच्या देशभक्तीचा पाठ देण्याचा छुपा रुस्तूमपणा दिग्दर्शकाने केला आहे. नौदलाचा एक कर्तव्यदक्ष अधिकारी रुस्तुम पावरी (अक्षय कुमार)घरी परततो तेव्हा त्याची लाडकी पत्नी सिंथिया (इलियाना डिक्रुझ) घरी नसते. सिंथियाऐवजी रुस्तुमच्या हातात पडतात ती तिला तिच्या प्रियकराने आणि त्याच्याच एकेकाळच्या मित्राने विक्रमने (अर्जन बाज्वा) लिहिलेली प्रेमपत्रे. सिंथिया घरी परतल्यानंतर तिच्याकडून तिची बाजूही समजून न घेता रुस्तुम आपल्या जहाजावर परततो. तिथून रिव्हॉल्व्हर घेऊन तो विक्रमच्या घरी जातो आणि त्याच्यावर तीन गोळ्या झाडतो. त्यानंतर स्वत:हून पोलिसांना शरण जातो. इथून सुरू होतो तो कमांडर नानावटी खटला..
नानावटी प्रकरण त्या काळी अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले होते. एका नौदल अधिकाऱ्याने विचारपूर्वक केलेली ही हत्या होती की परिस्थितीमुळे त्यांना बंदूक हातात घ्यावी लागली?, असा प्रश्न त्या काळी न्यायनिवाडा करण्यासाठी बसलेल्या ज्युरींसमोर होता. नानावटींच्या कारकिर्दीवर बाकी कसलाच डाग नव्हता. नानावटी प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी जॉन लोबो यांनी केला होता. चित्रपटात विन्सन लोबो (पवन मल्होत्रा) नावाने हा अधिकारी आणि कमांडर रुस्तुम पावरी यांच्यातील नोकझोक पाहायला मिळते. नानावटींच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना आणि त्यानंतरचा खटला हे सगळे जसेच्या तसे अगदी पारशी समाजाने त्यांना दिलेल्या पािठब्यासह, एका टॅब्लॉइड दैनिकाच्या पारशी संपादकाने या प्रकरणाला दिलेल्या कलाटणीसह सगळे तपशील समान आहेत. केवळ हे प्रकरण लोकांसमोर आणण्यामागे फार हशील दिग्दर्शकाला जाणवले नसावे म्हणूनच की काय त्याला संरक्षण खात्यातील गरव्यवहाराचे ठिगळ जोडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला दिसतो. मात्र त्यामुळे चित्रपटाचा हेतूच पुसला गेला आहे.
रुस्तुम पावरीच्या कृतीला देशभक्तीचे परिमाण देत मूळ कथा आणि त्यात महत्त्वाचा असलेला कोर्ट रूम ड्रामा मुळात दिग्दर्शकानेच बोथट करून टाकला आहे. अखेर रुस्तुमला हिरोच ठरवायचे होते तर कशासाठी घातला होता घाट?, असा प्रश्न पडतो. रुस्तुमच्या पत्नीचे एका क्षणासाठी फसणे, तिच्या फसण्यामुळे रुस्तुमने एका हत्येचे पातक डोक्यावर घेऊन अडकणे आणि पुन्हा एकदा विक्रमची हत्या पत्नीसाठी नाही तर देशासाठी केली असे सांगत त्याला सगळ्यातूनच क्लीन चिट देण्याचा प्रयत्न हास्यास्पद आणि खोटा ठरतो. तो काळ उभा करणं हे एक आव्हान दिग्दर्शकासमोर होतं ते त्याने संगणकीय प्रतिमा वापरून साध्य केलं आहे हेही जाणवत राहतं. रुस्तुमने तुरुंगात बुद्धिबळाच्या खेळात हरवलं म्हणून त्याचं सत्य उघड करण्यासाठी लोबोने पार दिल्लीपर्यंत जाऊन तपास करणं यासारख्या अनेक गोष्टी खटकणाऱ्या आहेत. अक्षय कुमारने रुस्तुम पावरी ही व्यक्तिरेखा पूर्णपणे पेलून धरली आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच त्याच्यासाठी पाहावासा वाटतो. काही काही प्रसंगांत केवळ नजरेने आपले भाव व्यक्त करत अक्षयने आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र रुस्तुम वगळता बाकीच्या व्यक्तिरेखा वरकरणी फसव्या वाटत राहतात त्यामुळे त्यांचा प्रभाव मर्यादित राहतो. इशा गुप्ता या अभिनेत्रीच्या मेकअपपासून अभिनयापर्यंत सगळ्याच गोष्टीतला भडकपणा अक्षरश: त्रासदायक ठरतो. समाजातील बऱ्यावाईट घटनांचा जनमानसावर होणारा परिणाम एकाच वेळी किती सूक्ष्म आणि बदल घडवणारा असू शकतो याचे उदाहरण त्या वेळी या खटल्याने घालून दिले होते. किंबहूना, त्यामुळेच नि:पक्षपातीपणे न्यायनिवाडा करता यावा यासाठी ज्युरी पद्धत कायमची बंद करण्यात आली होती. एकंदरीत या प्रकरणाचे निर्णायक आणि ऐतिहासिक महत्त्व म्हणून टिनू सुरेश देसाई दिग्दíशत ‘रुस्तुम’ पाहणे योग्य ठरेल.
रुस्तुम
निर्माता – नीरज पांडे, अरुणा भाटिया, नितीन केणी
दिग्दर्शक – टिनू सुरेश देसाई
कलाकार – अक्षय कुमार, इलियाना डिक्रुझ, इशा गुप्ता, अर्जन बाज्वा, सचिन खेडेकर, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, उषा नाडकर्णी.
