सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी नव्या वर्षांत आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. ऑगस्टमध्ये करीनाने तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने पतौडी पॅलेसवर करीना आणि मुलांसोबत राहण्याबाबतचा प्लॅन सांगितला.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने पतौडी पॅलेसवर कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला, “पतौडी पॅलेसवर मी करीना आणि दोन मुलांसोबत निवांत राहू शकतो. मी झाडं लावेन, स्विमिंग करेन, स्वयंपाक करेन, पुस्तकं वाचेन, कधीतरी मित्रांना भेटेन. मुंबईत आमचं घर असल्याने इथे फक्त कामानिमित्त आम्ही येऊ शकतो.”

आणखी वाचा- पतौडी पॅलेस ८०० कोटींना विकत घेतला ? सैफने केला खुलासा

या वयात पुन्हा बाबा होण्याविषयी सैफने पुढे सांगितलं, “मुलांचं संगोपन करण्यासाठी माझं अगदी योग्य वय आहे. कारण जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा अनेक गोष्टींची काळजी तुम्हाला सतावत असते. करिअरचा प्रश्न असतो. आता करिअरचा प्रश्न नाही आणि मुलांना देण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आणि संयम आहे. माझ्यासाठी यापेक्षा सुंदर आयुष्य अजून काहीच असू शकत नाही.”