आजच्या धकाधकीच्या जीवनात, आणि नागरीकरणामुळेही महानगरे, छोटी शहरे आणि गावांमध्येही आधुनिकतेचे, जागतिकीकरणाचे पडसाद मोठय़ा प्रमाणावर उमटताना दिसतात. करिअर करणे, श्रीमंत होणे, त्यासाठी तीव्र स्पर्धेला तोंड देत असताना छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतील आनंद मिळविणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे याचा विसर पडला आहे. महानगरांमधील लहान मुलेही टीव्हीला नाक लावून बसलेली दिसतात. त्यांच्या वाढीला योग्य असे पर्यावरण लाभत नाही. आपल्या अवतीभवतीच्या या परिस्थितीत नोकरी करणारे आईवडील मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी, मुलांना वाईट सवयी, व्यसने लागतात, चांगला मित्रपरिवार त्यांना मिळत नाही याबाबत आपल्याकडे बरेच चर्वितचर्वण नेहमी सुरू असते. या सगळ्यात मुलांवर चांगले संस्कार करण्याची इच्छा असूनही शक्य नसते. याच विषयावर अजिबात उपदेशाचे डोस पाजण्याचा आव न आणता मुलांच्या कलाने अतिशय हळुवार पण परिणामकारक पद्धतीने ‘सलाम’ हा चित्रपट बेतलेला आहे.
आपल्या राज्यात काही तालुक्यांतील गावांना लष्करी सेवा आणि पोलीस सेवा यांची परंपरा लाभली आहे. या गावांतील तरुणांच्या अनेक पिढय़ा एक तर लष्करी सेवेत तरी असतात किंवा पोलीस सेवेत दाखल झालेल्या असतात. याच परंपरेतील शंकर पालकर आणि परशुराम पाटील या दोन मित्रांचेही कुटुंब आहे. शंकर पालकर पोलीस सेवेत, तर परशुराम पाटील लष्करी सेवेत आहेत. त्या दोघांची शाळकरी वयातील मुले अनुक्रमे रघु आणि सदा हेही एकाच वयाचे असून तेही जिवलग मित्र आहेत. शाळेत जाताना एकत्र, खेळायला-हुंदडायला एकत्र, गावातील जत्रेत एकत्र त्यामुळे रघु आणि सदा यांची गट्टी जमलेली आहे. लष्करात आपले बाबा आहेत त्यामुळे तेच शूर आहेत असा सदाचा दावा, तर लष्करापेक्षा पोलीसच अधिक शूर असतात असा रघुचा दावा. त्यामुळे दोघांच्यात एक प्रकारची स्पर्धा आहे. परशुराम पाटीलला शौर्यपदक मिळणार अशी बातमी मिळते, गावच्या उत्सवात त्याचा गौरव होतो. परशुकाकाने सदाला आणली तशी झकास बंदूक आपल्यालाही आणा म्हणून रघु बाबांच्या मागे लागतो. परंतु शंकर पालकर त्याला तशी बंदूक देत नाही. त्याऐवजी एक शाईचे सुंदर पेन देतो. गावचा उत्सव तोंडावर असताना परशुराम पाटीलला सुट्टी सोडून लष्करात सेवेवर जावे लागते. उत्सव संपल्यावर शंकर पालकरही सुट्टी संपवून पोलीस सेवेसाठी मुंबईला निघून जातो. जाण्यापूर्वी तो आपल्या मुलाला रघुला काही गोष्टी सांगतो. पोलीस शूर असतो की लष्करी जवान अधिक शूर असतो असे रघु बाबांना विचारतो. त्यावर सर्वसामान्य माणूसही आपल्या हिकमतीने शूर ठरू शकतो. खरे बोलणे, भीती वाटते त्या गोष्टीवर मात करणे, कुणाचा जीव वाचविणे हेही शूरपणाचे लक्षण असते असे रघुला सांगतो. त्यानंतर एक घटना घडते आणि दहा-बारा वर्षांचा रघु अचानक मोठा होतो, गंभीर बनतो.
शाळकरी वयातील गमतीजमती, गावातील हुंदडणे, काकडय़ा चोरून खाणे, खोडी करणे, शाळेतील नाटकातील वेगवेगळ्या भूमिका साकारणे, शाळेतील मास्तरांनी सांगितलेल्या शाहिस्तेखान-शिवाजी महाराज यांच्या कथेचा मुलांवरील प्रभाव असे शाळकरी वयातील मुलांचे अनुभव दिग्दर्शकाने अतिशय सहजपणे, विनोदी पद्धतीने मार्मिकपणे दाखविले आहेत. मुद्दामहून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून नकळतपणे संस्कार करता येतात, मूल्यशिक्षण देता येते हे हा चित्रपट प्रकर्षांने अधोरेखित करतो. अतिशय नेत्रसुखद चित्रचौकटी, सर्वाचा उत्तम अभिनय, सर्वच बालकलाकारांनी समरसून काम केल्यामुळे प्रेक्षक रमतो, चित्रपटातील लहान मुलांच्या व्यक्तिरेखांची धमाल पाहता पाहता प्रेक्षकही क्वचित बालपणीच्या आठवणीत रमून जातो.
टिम्बकटू हे गाणे आणि एकूणच सिनेमाचे अप्रतिम संगीत, सर्व प्रमुख कलावंत आणि प्रमुख बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.
कॅलिक्स मीडिया अ‍ॅण्ड एण्टरटेन्मेंट निर्मित
सलाम
निर्माते – डॉ. गौरव सोमाणी
दिग्दर्शक – किरण यज्ञोपवित
कथा, पटकथा-संवाद – किरण यज्ञोपवित
छायालेखन – अभिजित अब्दे
संगीत – राहुल रानडे
ध्वनी संयोजन – अनमोल भावे
कलावंत – गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, सिद्धेश्वर झाडबुके, सुहास शिरसाट, बालकलाकार विवेक चाबूकस्वार व अन्य.