सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि सचिन तेंडूलकरचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओध्ये दोघांमध्ये संवाद सुरु आहे. दरम्यान सलमानने सचिनला त्याचा १०० शतकांचा रेकॉर्ड कोण मोडू शकेल असा प्रश्न विचारला आहे. पण सचिनने दिलेले उत्तर ऐकून आजही तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ २०१२ मधील आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी २०१२ मध्ये सचिन तेंडूलकरने १०० शतक पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीला क्रिकेटपटूंसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी देखील हजेरी लावली होती. या पार्टीतील व्हिडीओ बॉलिवूड फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान ‘तुम्हाला काय वाटतं तुमचा १०० शतकांचा रेकॉर्ड कोण मोडू शकेल?’ असा प्रश्न सचिनला विचारताना दिसत आहे. त्यावर सचिन लगेच ‘माझ्या मागे बरेच तरुण क्रिकेटपटू बसले आहेत. खासकरुन विराट आणि रोहित. जर कोणी भारतीय माझा हा विक्रम मोडणार असेल तर काही हरकत नाही’ असे सचिनने म्हटले आहे.

सलमान आणि सचिनमधला संवाद ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्यांना हसू आले आहे. सध्या हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. त्यावेळी या पार्टीला सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आमिर खान, प्रियांका चोप्रा आणि इतर कलाकार हजेरी लावली होती.