करोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून भारतात ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र काही लोक अजूनही घराबाहेर पडून स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांसाठी अभिनेता सलमान खानने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांना लोकांना समज दिला असून लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर तो भडकला आहे.
काय म्हणाला सलमान?
“डॉक्टर व नर्सेस तुमचे प्राण वाचवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर दगडफेक करताय. करोना पॉझिटिव्ह रुग्णालयातून पळून जात आहेत. कोणत्या दिशेला पळताय तुम्ही? मृत्यूकडे की जीवनाकडे? जर हे डॉक्टर तुमचा उपचार करत नसते आणि पोलीस रस्त्यांवर सुरक्षेसाठी नसते तर काही लोक (ज्यांना असं वाटतं की आम्हाला करोना होणार नाही) देशाच्या अनेक लोकांसोबत आपलेही प्राण गमावून बसतील. ज्यांच्याकडे दोन वेळचं पोट भरायला जेवण नाहीये, मुलांचं पोट भरण्यासाठी अन्न नाही, त्यांना मी सलाम करतो. कारण त्यांनाही हे ठाऊक आहे की कुटुंबीयांना गमावण्यापेक्षा ही वेळ निघून जाणं योग्य आहे. देशात खूप चांगलं काम होतंय. देशाचे नागरिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. मात्र काही जोकर्समुळे करोना पसरतोय. तुम्ही नीट वागला असता तर आतापर्यंत आपण सर्वजण पुन्हा कामावर रुजू झालो असतो. चीनमधून सुरू झालेला करोना आता तिथे नियंत्रणातसुद्धा आला आहे. मात्र आपल्याकडे काही लोकांमुळे संपूर्ण देशवासियांना घरात बसावं लागत आहे. तुम्ही खूप ताकदवान आहात हे मानतो. पण तुम्ही इतके साहसी व ताकदवान आहात की तुमच्या कुटुंबीयांच्या मृतदेहाला खांदा देऊ शकाल? इतकी हिंमत आहे का? प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. याच्याही दोन बाजू आहेत. एकतर सर्वजण राहतील किंवा मग कोणीच नाही राहणार. आता तुम्ही ठरवा…”
आणखी वाचा : लारा दत्ताचा ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतला ‘हा’ रेकॉर्ड 20 वर्षांनंतरही मोडणं अशक्य
सलमानच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउनदरम्यान सलमान त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या सतत संपर्कात आहे.