बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देणारी सलमान खान आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या ही जोडी तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आली असून आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातून रसिकांना ‘प्रेम’ नावाची सलमानची व्यक्तीरेखा पुन्हा एकदा पाहता येणार आहे.
या चित्रपटात सलमान सोबत अभिनेत्री सोनम कपूर देखील असणार आहे. त्याचबरोबर अभिनेता नील नितीन मुकेश चित्रपटात सलमानच्या लहान भावाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खैर देखील या चित्रपटात असणार आहेत.
सुरज बडजात्यांना सलमान खानबरोबर काम करता यावे, यासाठी बोनी कपूरने सलमान खान काम करत असलेल्या ‘नो एन्ट्र में एन्ट्री’ या चित्रपटाच्या तारखांच्या नियोजनात बदल केला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने सुरज बडजात्या ८ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या आधी ‘हम आप के है कोन’ या चित्रपटासाठी सलमान खान आणि सुरज बडजात्या यांनी एकत्रित काम केले आहे. सूरज बडजात्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रमुख अभिनेत्याने ‘प्रेम’ नावाने भूमिका साकारली आहे. यात सलमानसोबतच्या ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ तसेच शाहीद कपूरची मुख्य भुमिका असलेला ‘विवाह’, ह्रतिक रोशनचा ‘मै प्रेम की दिवानी हूँ’ या चित्रपटांचाही यात समावेश आहे.
आता सलमानसोबतचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.