गेल्या काही दिवसांपासून ज्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. कारण रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरइतकाच किंबहुना त्याहून अधिकच हा ट्रेलर धमाकेदार ठरला आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणबीर संजूबाबाची भूमिका साकारत आहे. रणबीरसोबतच सोनम कपूर, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, जिम सर्भ अशी कलाकारांची फौजच या चित्रपटात पाहायला मिळते.

‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटापासून ते संजय दत्तचे रिलेशनशिप, त्याची व्यसनाधीनता, कारागृहात काढलेले दिवस हे सर्व या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट असून संजय दत्त म्हणून रणबीरने अप्रतिम भूमिका साकारली आहे. पडद्यावर आपण रणबीरला नाही तर संजय दत्तलाच पाहतोय असं वाटल्यास नवल नाही. यासाठी रणबीरने घेतलेली कठोर मेहनत स्पष्ट दिसू लागते.

पाहा ट्रेलर-

यामध्ये संजय दत्तच्या आईची म्हणजेच नर्गिस यांची भूमिका मनिषा कोइराला साकारत असून परेश रावल त्याच्या वडिलांची अर्थात सुनिल दत्त यांची भूमिका साकारत आहे. दिया मिर्झा संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तच्या भूमिकेत तर अनुष्का शर्मा एका पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. येत्या २९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.