अभिनेता शाहीद कपूरने लहानपणी पाहिलेले एक स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. शाहीद कपूर घोडय़ावर बसून चक्क तलवारबाजीही करणार आहे. घोडय़ावर बसून तलवारबाजीवर करण्याचे स्वप्न शाहीदने लहानपणापासून पाहिले होते आत्तापर्यंतच्या अभिनय प्रवासात शाहीदला हे स्वप्न पूर्ण होईल अशी भूमिका साकारायला मिळाली नव्हती. मात्र आता साजिद नाडियादवाला यांच्या आगामी एका चित्रपटाच्या आणि त्यातील भूमिकेच्या माध्यमातून शाहीदचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दक्षिणेत गाजलेल्या ‘मगाधीरा’ या चित्रपटाचे हक्क नाडियादवाला यांनी घेतले असून यातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी शाहीदची निवड केली आहे. दक्षिणेत तयार झालेल्या मूळ चित्रपटात राम चरण व काजल अग्रवाल हे प्रमुख भूमिकेत होते. शाहीदने सध्या ‘शानदार’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून सध्या तो अभिषेक चौबे यांच्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणार आहे. त्यानंतर ‘मगाधीरा’ला तो सुरुवात करणार आहे. घोडय़ावर बसून तलवारबाजी करण्याचे स्वप्न मी लहानपणापासून पाहिले होते. ‘मगाधीरा’च्या निमित्ताने माझे ते स्वप्न पूर्ण होणार असल्याने शाहीद सध्या खुशीत आहे.