अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनमध्ये पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सोनाली दररोज तिच्या आवाजात वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. या पॉडकास्टमध्ये शुक्रवारी तिने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली. ‘माझं कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न झालेलं नाही’, हे स्पष्ट करत असतानाच सोनालीने लग्नाबाबत तिची कोणती स्वप्नं आहेत, याबद्दलही सांगितलं.
‘क्लासमेट्स’ या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना सोनालीचं लग्न झालं अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. याविषयी सोनाली म्हणाली, “मी संपूर्ण स्टारकास्टसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. तेव्हा सोशल मीडियावर माझ्या लग्नाची बातमी व्हायरल झाली. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाशी माझं लग्न झालं, अशी ती बातमी होती. आम्ही सगळेजण ती बातमी वाचून हसलो, कारण त्यात तथ्य काहीच नव्हतं. अफवा समजून मी त्याकडे दुर्लक्षसुद्धा केलं. मात्र काही दिवसांनी मला माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचा फोन आला. ती माझ्या लग्नाबद्दल विचारत होती. तेव्हा मला समजलं की ही अशीच पसरणारी साधी अफवा नाही. माझा मित्र सुशांत शेलारला मी याबद्दल माहिती काढण्यास सांगितलं. कारण सुशांतचे बरेच राजकीय संपर्क आहेत. त्याने थोडीफार माहिती काढली तेव्हा समजलं की कोल्हापूरच्या एका विरोधी पक्षाने त्या संबंधित राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन व्हावी यासाठी अशा लग्नाच्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र यात माझं नाव का गोवण्यात आलं हे मला आजपर्यंत पडलेलं कोडं आहे.” या सर्व अफवांचा खूप त्रास झाला पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी यातून सावरू शकले, असंही ती म्हणाली.
“ लग्न घाई”
सगळ्यांनाच खूप काळजी वाटतेंय माझ्या लग्नाची…
तर मग ऐकाच.New episode of my podcast #सोनालीसांगतेऐका is
OUT NOW https://t.co/HthmuOiMN7@Hubhopper @hashtagconnect2 pic.twitter.com/Yv3kO2WxkQ— Sonalee (@meSonalee) May 15, 2020
या पॉडकास्टमध्ये सोनालीने तिला चार विविध पद्धतींनुसार लग्न करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. आई पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतींनुसार, महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार, ख्रिश्चन लग्नाबद्दल विशेष आकर्षण असल्याने त्या पद्धतीनुसार आणि होणाऱ्या जोडीदाराची जी पसंत असेल त्यानुसार लग्न.. अशा चार पद्धतींनुसार लग्न करण्याचं स्वप्न असल्याचं सोनालीने चाहत्यांना सांगितलं.
