लॉकडाउनच्या काळात असंख्य स्थलांतरीत मजुरांची मदत करणारा अभिनेता सोनू सूद आज अनेकांसाठी हिरो झाला आहे. त्याच्या मदतकार्यामुळे संपूर्ण देशात त्याची चर्चा आहे. आतापर्यंत सोनूने विविध माध्यमातून गरजूंची मदत केली असून आता त्याने मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पंचकूला येथील एका गावतील मुलांच्या शिक्षणासाठी त्याने स्मार्फटोन वाटले आहेत.

लॉकडाउनच्या काळात शाळे, महाविद्यालये बंद असल्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाइन मुलांना शिकविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी योग्य सोईसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच सोनूने पंचकूलामधील मोरनी येथील एका गावातील शाळकरी मुलांमध्ये स्मार्टफोनचं वाटप केलं आहे. सोनू सूदने ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

“सगळ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता यावं यासाठी स्मार्टफोन मिळाले आहे आणि माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे. पढ़ेगा भारत तभी तो बढ़ेगा भारत”, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे.

“मोरनी येथील कोटी गावातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत त्यामुळे या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हतं. तसंच काही मुलांना दररोज ४ ते ५ किलोमीटर दूर दुसऱ्या मुलांच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं. परंतु, सोनू सूदला याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आणि चंदीगढमधील त्यांचा मित्र करण लूथरा यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या गरजू विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनचं वाटप केलं. त्यामुळेच या मुलांसह मीदेखील सोनू सूदचे मनापासून आभार मानतो”, असं सरकारी शाळेचे मुख्याध्यापक पवन जैन म्हणाले.

दरम्यान, कोटी गाव हे हिमाचल सीमाभागात येत. त्यासोबतच तिने बऱ्याच वेळा नेटवर्कची समस्यादेखील भेडसावत असते. त्यातच मुलांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. परंतु, सोनू सूदने या मुलांची मोठी समस्या दूर केल्याचं म्हटलं जात आहे.