दाक्षिणात्य अभिनेता व शेफ मधमपट्टी रंगराज याने स्टायलिस्ट जॉय क्रिझिल्डाशी दुसरं लग्न केलं आहे. त्याने अचानक लग्नाची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर लग्नाची बातमी शेअर केल्यावर काही तासांनी ते आई-बाबा होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. एकीकडे चाहते या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे मधमपट्टी रंगराजची पहिली पत्नी श्रुतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटने लक्ष वेधून घेतले आहे.

रविवारी जॉयने मधमपट्टी रंगराजबरोबर मंदिरात लग्न केल्याची माहिती दिली. तसेच तिने लग्नाचे काही फोटोही पोस्ट केले आणि “Mr and Mrs Rangaraj” असं कॅप्शन त्या फोटोंना दिलं.

जॉय व मधमपट्टी यांनी लग्न केल्याची बातमी समजताच चाहते त्यांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच जॉयने पुन्हा काही फोटो पोस्ट केले. त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “बाळ २०२५ मध्ये येणार आहे. आम्ही गरोदर आहोत. प्रेग्नेन्सीचा सहावा महिना,” असं जॉयने फोटोंबरोबर लिहिलं.

मधमपट्टी रंगराजची पहिली पत्नी कोण?

अभिनेता मधमपट्टी रंगराजच्या पहिल्या पत्नीचे नाव श्रुती आहे. ती मूळची कोइम्बतूर येथील आहे. ती वकील आहे. श्रुतीने म्हटलंय की ती आणि रंगराज कायदेशीररित्या अजूनही विवाहित आहे. श्रुती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती अनेकदा त्यांच्या दोन मुलांसह फोटो पोस्ट करते. तिच्या इन्स्टाग्रामवर अजूनही रंगराजबरोबरचे फोटो आहेत आणि “Madhampatty Rangaraj’s wife,” (मधमपट्टी रंगराजची पत्नी) असं तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे. श्रुती व मधमपट्टी रंगराजचा घटस्फोट झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघांनीही यासंदर्भात काहीच वक्तव्य केलं नाही. पण अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

कोण आहे मधमपट्टी रंगराज?

मधमपट्टी रंगराज हा एक प्रसिद्ध शेफ व अभिनेता आहेत. त्याने १९९९ मध्ये शेफ म्हणून करिअरला सुरुवात केली होती, नंतर बेंगळुरूमध्ये एक रेस्टॉरंट सुरू केले आणि नंतर गावी परत जाऊन केटरिंग व्यवसाय सुरू केला. त्याच्या टीमने अभिनेता कार्तीसह ४०० हून अधिक लग्नांमध्ये केटरिंगचे काम सांभाळले. मधमपट्टी रंगराजने फक्त शेफ म्हणूनच नाही तर अभिनयासाठीही लोकप्रियता मिळवली. त्याने ‘मेहंदी सर्कस’, आणि ‘कुकू विथ कोमाली’ सारख्या शोमध्ये भूमिका केल्या.