दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणजे ज्युनियर एनटीआर होय. त्याने अवघ्या ८ व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याचा जन्म चित्रपटसृष्टीतील कुटुंबात झाला. त्याचे कुटुंबीय राजकारणातही सक्रिय होते. ज्युनियर एनटीआरला अभिनयाचा वारसा कुटुंबातून मिळाला आहे. त्याचे आजोबा ज्येष्ठ तेलुगू अभिनेते, चित्रपट निर्माते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामा राव होते. तर, त्याचे वडील अभिनेते आणि राजकारणी नंदमुरी हरिकृष्णा आहेत.
ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ रोजी झाला. त्याला प्रेमाने तारक असेही म्हणतात. ज्युनियर एनटीआरने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्याच्या आजोबांच्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मर्षि विश्वामित्र’ होता. यामध्ये त्याने राजा भरतची भूमिका साकारली होती. तर, त्याचा दुसरा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव ‘रामायण’ होतं. यात त्याने १४ व्या वर्षी भगवान श्री रामाची भूमिका साकारली होती. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नंतर, त्याने वयाच्या १८ व्या वर्षी २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निन्नू चूडालानी’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.
ज्युनियर एनटीआरने २००१ मध्ये त्याचा पहिला सुपरहिट चित्रपट ‘स्टुडंट नंबर १’ दिला. हा ज्युनियर एनटीआरचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला सुपरहिट चित्रपट होता. हा एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. ज्युनियर एनटीआर आणि राजामौली यांच्या जोडीने आतापर्यंत ‘सिंहाद्री’, ‘लोक-परलोक’ आणि ‘आरआरआर’ यासह ४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि चारही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. ज्युनियर एनटीआर करिअरबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. २०११ मध्ये त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते, पण एका कारणामुळे लग्न वादात अडकलं होतं.
Jr NTR चं लग्न वादात का अडकलं होतं?
ज्युनियर एनटीआरचे भव्य लग्न खूप चर्चेत राहिले होते. २०११ मध्ये त्याने उद्योगपती नार्णे श्रीनिवास राव यांची मुलगी लक्ष्मी प्रणतीशी लग्न केलंय. या जोडप्याच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत. या जोडप्याला अभय व भार्गव ही दोन मुलं आहेत. ज्युनियर एनटीआरचं लग्न हे त्या वर्षातील सर्वात मोठं भव्यदिव्य लग्न होतं. या लग्नासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून फक्त मांडव सजवण्यात आला होता. तसेच प्रणतीने लग्नात नेसलेल्या साडीची किंमत १ कोटी रुपये होती. लग्नानंतर साडी दान करण्यात आली होती. या लग्न समारंभात १२ हजार चाहत्यांसह ३ हजार हाय प्रोफाइल पाहुणे देखील उपस्थित होते.
ज्युनियर एनटीआरशी साखरपुडा झाला तेव्हा लक्ष्मी प्रणती फक्त १७ वर्षांची होती, असं म्हणतात. त्यामुळे लग्नाची बातमी आल्यानंतर विजयवाडा येथील वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी बालविवाह कायद्यांतर्गत अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. वाढता वाद पाहून, ज्युनियर एनटीआरने सगळं शांततेत व्हावं यासाठी प्रणती १८ वर्षांची होईपर्यंत वाट पाहिली. ती १८ वर्षांची झाल्यानंतर, ५ मे २०११ रोजी त्यांचे लग्न झाले.
Jr NTR चं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी नातं काय?
ज्युनियर एनटीआरचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी खास नातं आहे. अभिनेत्याचे सासरे आणि लक्ष्मी प्रणतीचे वडील श्रीनिवास हे चंद्राबाबू नायडू यांचे जावई आहेत. श्रीनिवासची पत्नी चंद्राबाबू नायडू यांची पुतणी आहे. त्यांनीच हे नातं सांगितलं होतं.