गेल्या काही काळामध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळेच आज बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अन्य भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, टॉलिवूड यांमधील कलाकारांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यातच अभिनेता सलमान खानलादेखील दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत काम करण्याची इच्छा आहे. परंतु ‘सलमानला मल्याळम चित्रपटात घेणं परवडणारं नाही’, असं दाक्षिणात्य सुपरस्टार मामूट्टी यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
‘पिंकव्हिला’नुसार, काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये मामूट्टी यांना सलमान खानसोबत काम करण्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना सलमानचं मानधन परवडण्यासारखं नाही असं त्यांनी सांगितलं. ‘मला वाटत नाही की सलमान खान कधी मल्याळम चित्रपट करतील. मल्याळम भाषा ही त्यांच्यासाठी कठीण आहे. तसंच सलमान खानसारख्या सुपरस्टारला मल्याळम चित्रपटामध्ये घेणं आर्थिकदृष्या परवडण्यासारखंही नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत आतापर्यंत कोणताच मल्याळम चित्रपट केलेला नाही. त्यापेक्षा मला त्यांच्याबरोबर एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये काम करणं जास्त सोईस्कर होईल’, असं मामूट्टी यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, ‘पूर्वी मला बॉलिवूड चित्रपटांसाठी ऑफर्स येत होत्या. मात्र आता एकही येत नाही. पण जर एखादी चांगली ऑफर आलीच तर मी नक्की तो चित्रपट करेन’.दरम्यान, सलमानने अनेक वेळा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सलमान ‘दबंग ३’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहेत. तर मामूट्टी त्यांच्या आगामी ‘ममांगम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.