चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध आयडिया काढल्या जातात, हे आपल्याला माहीत आहेच. प्रसिद्धीसाठी पोस्टर्सपासून ते सोशल मिडियापर्यंत सर्व पर्याय वापरले जातात. शहराशहरात स्वतः कलाकार जाऊन त्याची प्रसिद्धी करतात. या सर्वाचा मूळ उद्देश असतो आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा. अर्थात या प्रसिद्धीच्या क्लुप्त्या केवळ चित्रपटासाठी नाही तर, पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा वापरल्या जातात. आंतराष्ट्रीयच नव्हे तर भारतीय बाजारपेठेतही हॅरी पॉटरच्या श्रुंखलेच्यावेळी केवळ प्रसिद्धीच्या जोरावर त्यावेळेचे पुस्तक विक्रीचे सर्व विक्रम मोडले होते. आपल्याकडे चेतन भगत, अमिष त्रिपाठीच्या पुस्तकांबाबतही काहीसे असेच चित्र दिसून येते. अशाच प्रसिद्धीच्या आयडिया स्पृहा जोशी हिच्या आगामी ‘लोपामुद्रा’ या काव्यसंग्रहासाठी काढल्या जात आहेत.
स्पृहा जोशीचे कवितेवरील प्रेम काही नवीन नाही. ‘चांदणचुरा’ या तिच्या पहिल्या काव्यसंग्रहाला तिच्या चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. लोपामुद्रामध्ये स्पृहाच्या कवितांसोबत सुमीत पाटील याच्या १६५ चित्रांचाही समावेश असणार आहे. पुस्तकासंबंधी बोलताना स्पृहाने सांगितले, ‘या पुस्तकातील कवितांमध्ये स्त्रीच्या भावविश्वाचे वर्णन केले आहे आणि कवितेच्या अर्थाला साजेलशी चित्रे सुमीतने रेखाटली आहेत.’  पण कुतुहलाचा भाग म्हणजे या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी खास प्रयोग करण्यात आले आहेत. सुरवात झाली मनश्री सोमण या अंध मुलीवर केलेल्या गाण्यापासून. स्पृहाच्या या कवितेला संगीतबद्ध करण्याची संकल्पना सुमीतने मांडली आणि सोमेश नार्वेकर याने ती कविता प्रत्यक्ष मनश्रीच्या आवाजात संगीतबद्ध केली. ९एक्स चॅनलला एका चित्रकार अंध मुलीवर केलेली कवितेची संकल्पना आवडली आणि त्यांनी या कवितेचे हक्क घेतले. त्या कवितेपासून सुरुवात झाल्यावर ‘लोपामुद्रा’ पुस्तक तयार होण्यापर्यंत या काव्यसंग्रहाबद्दलची उत्कंठा तयार करण्याची जबाबदारी सचिन दळवी आणि उदय कर्वे या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी घेतली. त्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर खास लोपामुद्राच्या नावाने एक पेज चालू केले. आम्हाला लोकांच्या मनात लोपामुद्राबद्दल उत्सुकता वाढवायची होती. त्यामुळे आम्ही छोटय़ाछोटय़ा स्पर्धा काढून चाहत्यांना त्यात सहभागी करुन घेतले. पुस्तक बाजारपेठेत येण्याअगोदर त्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना कळावे हा यामागचा उद्देश होता, असे मत सचिनने व्यक्त केले. अर्थात स्पर्धा घ्यायच्या म्हणजे बक्षीसे आलीच. त्यासाठी सुमीत आणि वरद लघाटे यांनी पुस्तकातील कविता आणि चित्रे यांची कोलाज करुन टिशर्ट्स, मग्स आणि छत्र्या तयार केल्या. साधारण ३०० ते ३५० रुपयात टिशर्ट्स, २०० रुपयापर्यंत मग आणि ५०० रुपयापर्यंत छत्र्या तुम्हाला त्यांच्या फेसबुक पेजवरुन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लवकरच मराठी पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी असेच काही अभिनव प्रयोग पहायला मिळतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. इतकेच नाही तर हे टिर्शट्स घालून मराठीतील काही आघाडीच्या कलाकारांनी खास फोटोशुटही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spruaha joshis new collection of poems lopamudra