बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अन् याचा सर्वाधिक दोष दिला जातोय निर्माता करण जौहरला. करणने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. मात्र या पोस्टमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. परिणामी करणची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे.

“गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे.” अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती. मात्र ही पोस्ट नेटकऱ्यांनी आवडली नाही. ‘नेपोटीझम प्रमोटर’ असं म्हणत त्यांनी करणवर टीका करण्यास सुरुवात केली. एवढेच काय तर केवळ २० मिनिटांमध्ये त्याचे १० लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले. यापूर्वी त्याला तब्बल १ कोटी १० लाख लोकं फॉलो करत होते. त्याच्या इन्स्टा प्रकरणामुळे हा आकडा आता १ कोटींवर आला आहे.

तर दुसरीकडे कंगना रनौतचे मात्र फॉलोअर्स वाढले आहेत. तिने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला दोष दिला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल १२ लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे केवळ २० लाख फॉलोअर्स होते. आता ३२ लाख लोक तिला फॉलो करत आहेत.