देशात सध्या करोनाचा प्रादूर्भाव वाढतोय. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढू लागला आहे. देशवासियांनी सध्याच्या परिस्थिती संयमाने वागत एकत्रित येण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थित अनेक कलाकारही सोशल मीडियावरून मदतीचा हात पुढे करत आहेत.

गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर ट्रीपचे फोटो शेअर करणाऱ्या अनेक कलाकारांवर काही सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. देश मोठ्या संकटाचा सामना करत असताना आपण मजा-मस्ती करतानाचे फोटो शेअर करणं योग्य आहे का? अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. यातच आता सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. एक व्हिडीओ शेअर करत स्वप्निलने दिलगिरी व्यक्त केली आहे.

स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो म्हणाला, ” पुढचे काही दिवस मी सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणार नाही. सोशल मीडियाचा वापर आपण करोनाचं युद्ध जिंकण्यासाठी करायला हवा. त्यामुळे काही दिवस एकतर मी सोशल मीडियावर सक्रिय नसेल किंवा असलो तरी त्या पोस्ट करोना संबंधित असतील. करोनाची माहिती असले. एखाद्याला मदत हवी असेल तर त्याचं आवाहन असेल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मी मनोरंजनाच्या पोस्टसाठी वापरणार नाही. त्याबद्दल दिलगिरी.” असं म्हणत स्वप्निलने सोशल मीडियाचा वापर करोनाशी लढण्यासाठी करुया असं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi share video said will use social media only for corona updates and help not for entertainment kpw