सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिची नवीन वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. ‘रसभरी’ असं या वेब सीरिजचं नाव असून स्वराने यामध्ये शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. मात्र ही वेब सीरिज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली नसून अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलंय. यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत.

काहींनी या वेब सीरिजला फ्लॉप म्हटलं तर काहींनी थेट यानंतर अॅमेझॉनचं सबस्क्रीप्शन बंद करणार असल्याचं म्हटलं. ‘ही सीरिज बी ग्रेड आणि सी ग्रेड चित्रपटांच्या तुलनेतही वाईट आहे’, अशा शब्दांत एका नेटकऱ्यांने टीका केली.

शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती या वेब सीरिजची कथा फिरते. विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणाऱ्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीने यात भाष्य करण्यात आलं आहे. निखिल भट्ट यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे स्वरा यामध्ये दुहेरी भूमिकेत आहे.

‘इट इज नॉट दॅट सिम्पल’ या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजनंतर स्वराची ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वराने आतापर्यंत ‘तनू वेड्स मनू’, ‘रांझना’, ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘अनारकली ऑफ आरा’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.