Actor Dilip Joshi Weight Loss Tips : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. यात जेठालाल गडा ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. ५७ वर्षांचे दिलीप जोशी १७ वर्षांपासून या मालिकेत काम करत आहेत. यादरम्यान बरेचदा त्यांचा लूक बदललेला पाहायला मिळतो. दिलीप जोशी यांनी फक्त दीड महिन्यांत तब्बल १६ किलो वजन कमी केलं. यासाठी कोणताही डाएट घेतला नाही, तसेच जिममध्ये वेळही घालवला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
दिलीप जोशी यांनी फक्त धावण्यावर लक्ष केंद्रित करून वजन कमी केलं. यासाठी १९९२ साली आलेल्या ‘हुन हुंशी हुंशीलाल’ या गुजराती चित्रपटातील एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेकडून दिलीप जोशींना प्रेरणा मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करायचं होतं, तेव्हा त्यांनी रोज ४५ मिनिटं धावायचं ठरवलं.
मॅशेबल इंडियाशी बोलताना दिलीप जोशी यांनी वजन कमी करण्याबद्दल सांगितलं होतं. दिलीप जोशी काम संपवून जवळच्या स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलण्यासाठी जायचे आणि पाऊस पडत असला तरीही मुंबईतील ओबेरॉय हॉटेल ते मरीन ड्राइव्ह पर्यंत धावायचे. धावत यायला आणि जायला जवळपास ४५ मिनिटं लागायची. दिलीप जोशी न चुकता रोज धावायचे. धावणं हे त्यांच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग होता.
दिलीप जोशी यांनी हेच रुटीन फॉलो करून दीड महिन्यात १६ किलो वजन कमी केलं होतं. त्यांनी वजन घटवण्यासाठी कोणताही स्पेशल डाएट प्लॅन घेतला नव्हता. तसेच ट्रेनरची मदतही घेतली नाही आणि कोणतीही औषधं घेतली नव्हती. रोज न चुकता धावायचं हे त्यांनी ठरवलं होतं. दिनचर्येत सातत्य ठेवून त्यांनी वजन घटवलं होतं.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत जेठालाल गडा हे पात्र साकारून घराघरांत लोकप्रिय झालेल्या दिलीप जोशींनी बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ते सलमान खानच्या ‘हम आपके हैं कौन’ व ‘मैंने प्यार किया’ सिनेमात झळकले होते. तसेच सीआयडी व एफआयआर या शोमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या.