राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती रद्द करण्यात आली असली तरी पाचवीपर्यंत हिंदी ही ‘तिसरी भाषा’ म्हणून शिकणं बंधनकारक असेल. हिंदी भाषेसंदर्भात या निर्णयावर कलाविश्वातूनही प्रतिक्रिया येत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले यांनी याबद्दल पोस्ट केली आहे.

“आम्ही मराठी बोलतो…जसं जमेल तसं तोडकं मोडकं हिंदी बोलतो ..तेवढं जगायला पुरेसं आहे…एवढ्या नाजूक आणि लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदी किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच..

आम्ही कार्यक्रमात हमरेको तुमरेको करतो त्या भाषेत ही ९० टक्के मराठीच असतं …कारण आपण ९० टक्के मराठी माणसे याच प्रकारे हिंदीत व्यक्त होतो ..आणि ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं त्यामुळे आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका ..आणि जे समाजात दिसतं ते आम्ही दाखवतो. आमच्या ‘हमरेको तुमरेको’मुळे समाज अचानक हिंदी बोलायला लागला नाहीय…

आम्हाला ही हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, साहित्य आवडतं, आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही पण आम्ही सर्व ठिकाणी हट्टाने अभिमानाने मराठीच बोलतो. उदहरणार्थ अगदी मुंबई ते छत्रपती संभाजी नगर या इंडिगोच्या विमान प्रवासात घोषणा फक्त हिंदी आणि इंग्रजीतूनच होतात..महाराष्ट्रात असूनही मराठीत घोषणा होत नाही हे मी स्वानुभवावरून सांगतोय… त्या विमानात ही मराठीचा गंध नसणाऱ्या हवाई कर्मचाऱ्यांशी आम्ही हट्टाने मराठीतच बोलतो… रिक्षावाल्यांशी ही आम्ही मराठीतच बोलतो…महाराष्ट्रात मराठीच,” अशी पोस्ट समीर चौघुले यांनी केली आहे.

पाहा पोस्ट –

समीर चौघुलेंची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

हिंदीची सक्ती नको तशी मला वाटत इंग्लिशची ही सक्ती नको, आपल्या मराठी गावाकडच्या मुलांना इंग्लिश धड बोलायला येत नाही त्यामुळे ती मागे पडतात नोकरीसाठी ऑफिसमधील मुलाखती ह्या मराठी मधून घ्यायला हव्यात, तसेच कोर्टाचे कामकाजही मराठी मधून व्हायला हवे असा आग्रह ही मराठी माणसांनी करायला हवा, बॉलीवूड मधे तर फक्त पैसे कमावण्यासाठी हिंदी फिल्म करतात बाकी हे सगळे हिंदी कलाकार कायम इंग्लिश मधूनच बोलत असतात मुलाखतही कायम इंग्लिश मधून देतात हे कायम खटकते, अशी कमेंट समीर चौघुलेंच्या पोस्टवर एका युजरने केली आहे.

“मराठी कलाकाराने परखड भूमिका मांडली हे आवडलं…सोईस्कर मुग गिळून बसण्यापेक्षा सर्वच कलाकारांनी बोलायला हवे..हिंदीची सक्ती बाकीच्या राज्यात नाही मग इकडेच का याचे कारण लाचार नेते मंडळी.. महाराष्ट्रात फक्त मराठीच,” असं एक युजर म्हणाला.