Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy : ज्येष्ठ मराठी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह मेसेज केले होते, अशी पोस्ट अभिनेत्री प्राची पिसाटने केली होती. प्राचीने मेसेजचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले होते. त्यानंतर ५ दिवसांनी सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीच्या आरोपांना उत्तर दिलं. मात्र, त्या उत्तरांवर प्राचीचं समाधान झालं नसून तिने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.
सुदेश म्हशिलकर यांनी त्यांचं अकाउंट हॅक झालं होतं, असं म्हणत तक्रार दाखल केली आहे.
सुदेश म्हशिलकर यांची पोस्ट
खरंतर मी या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.
⸻
1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही.
त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे.
आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
⸻
2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे — ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं ???? असं दिसेल.
जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं.
पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
लोकांना अर्धवट माहिती देऊन अशाप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.
⸻
3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती.ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.
⸻
4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो.
माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.
⸻
5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.
⸻
6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात.
त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, अशी पोस्ट सुदेश म्हशिलकर यांनी केली.
प्राची पिसाटने काय म्हटलंय?
प्राचीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट करत लिहिलं, “नक्की माझा नंबर सेव्ह होता की नव्हता?
फेसबुक अकाउंटचा अॅक्सेस होता, अकाउंट हॅक झाल्यावर तर तुम्ही गप्प का बसलात?
अकाउंट हॅक झाल्याची पोस्ट फेसबुक फीडवर लगेच किंवा ५ दिवसांनी का केली नाही?
चॅटमधेच मेसेजच्या खाली लगेच मेसेज का नाही केले की अकाउंट हॅक झालंय असं
२०१७ मध्ये मी फक्त ३ महिने त्या मालिकेत काम केलेलं, त्यानंतर तुम्हाला कधी भेटले नाही, कधी पाहिलं नाही आणि कधी बोललेही नाही…
ओळख असणं, माहिती असणं, मैत्री असणं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत….
राहिला प्रश्न स्माईल इमोजीचा- तर ५०-६० वर्षांच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी वयाचा विचार करून प्रत्येक मुलगी हसून दुर्लक्ष करते आणि आदराने विषय संपवते. दुसऱ्यांदा ठामपणे दुर्लक्ष करते, मीही तेच केलं..
तरीही मेसेज थांबले नाहीत-तर तिसऱ्यांदा उत्तर देते आणि विषय संपवते, मीही तेच केलं!
‘सो कॉल्ड मोठे आहात वयाने असं समजून’ हसण्यावर नेलं तरी मुलगीच चुकीची… ठामपणे दुर्लक्ष केलं तरी मुलगीच चुकीची.. आणि तरीही मेसेज येणं थांबलं नाही म्हणून पोस्ट करून रिप्लाय दिला तरीही मुलगीच चुकीची.. मुलींनी नक्की बोलायचं कधी आणि करावं तरी काय? पुरुष कधी स्वतःची चूक मान्य करतील किंवा जबाबदारी घेतील,” असा प्रश्न प्राची पिसाटने पोस्टमध्ये विचारला आहे.