कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू माझा सांगाती’मध्ये प्रेक्षकांना संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ – संत तुकाराम. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेत रेखाटण्यात येत आहे. हजारहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे. जिथे तुकोबांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागणार आहे. पण भक्ताची ही आस भगवंत पूर्ण करणार का ? ती कशी पूर्ण करणार ? हा प्रवास आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तू माझा सांगाती’मध्ये प्रेक्षकांना आजवर संत चोखा मेळा, संत एकनाथ आणि नुकतीच संत सावता माळीची कथा पाहायला मिळाली आहे. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता मालिका एका नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. कारण, गावातील मंबाजी यांचे संत तुकारामांना नेहमी कमी लेखणे, त्यांच्या भक्तीवर प्रश्न करणे, त्यांच्या गोष्टींमध्ये कुरघोडी करणे असे सतत सुरु असते. आता मंबाजी संत तुकाराम यांना डिवचण्यासाठी एक नवी युक्ती योजणार आहेत. ज्याद्वारे ते तुकोबांना विचारणार आहेत की, तुम्ही विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहात, त्यांची सेवा करता परंतु तुम्हाला अजून भगवंताने दर्शन का दिले नाही? संत सावता माळी, संत चोखा मेळा, संत एकनाथ या सगळ्यांना त्यांनी दर्शन दिले आहे, त्यांची भक्ती स्वीकारली आहे. संत तुकोबा हे ऐकून खूप खचून जातात आणि ही घडलेली घटना आवलीला सांगतात. आवली यावरून मंबाजीला खूप सुनावते आणि विठ्ठलाच्या समोर कधी न गेलेली आवली पहिल्यांदा विठ्ठलासमोर नवऱ्यासाठी गाऱ्हाणं सांगते. आता यामागे भगवंताची काय इच्छा आहे ? विठ्ठल संत तुकाराम यांना कधी दर्शन देणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tu majha sangati marathi serial tukaram eagerly waiting for vithhal