‘द व्हायरल फिव्हर’ म्हणजेच टीव्हीएफचा सीईओ अर्णभ कुमारने त्याच्या पदाचा राजीनामा दिला. लैंगिक शोषण प्रकरणातील गोंधळानंतर जवळपास एका महिन्यानंतर त्याने हा निर्णय घेतल्याचे घोषणा केली.
अरुणभने एक ट्विट केले असून त्यात लिहिलंय की, गेल्या तीन महिन्यांमध्ये बरचं काही घडलंय. त्यामुळे मी मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खचलोय. पण, एक ना एक दिवस सत्य बाहेर येईल आणि त्याचा विजय होईल यावर माझा विश्वास आहे. माझ्यावर वैयक्तिकरित्या केल्या जाणाऱ्या आरोपांचा ब्रॅण्डला फटका बसत होता. याचे मला अधिक वाईट वाटतेय आणि त्याचमुळे मी टीव्हीएफच्या सीईओ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
I have decided to step down as #TVFCEO pic.twitter.com/JKY5X7NL54
— Arunabh Kumar (@ArunabhKumar) June 16, 2017
‘द व्हायरल फिव्हर’चा संस्थापक अरुणभ कुमार हा गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक छळाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. टीव्हीएफच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने अरुणभवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ‘द इंडियन उबर-दॅट इज टीव्हीएफ’ या ब्लॉगवर टीव्हीएफच्या कर्मचारी महिलेने स्वत:ची व्यथा मांडली होती. गेल्या वर्षी मेमध्ये अरुणभ कुमारने असभ्य वर्तन केले तसेच अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. यानंतर आणखी काही महिलांनीही अरुणभविरोधात लैंगिक छळाचे आरोप केले होते. सध्या जामीनावर बाहेर असलेल्या अरुणभने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपल्याला मुद्दामून याप्रकरणात गुंतवले जात असल्याचे म्हटलेय. भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३५४A (लैगिक अत्याचार) आणि ५०४ अंतर्गत अरुणभविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
