ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन | veteran marathi dramatist actor Mohandas Sukhtankar passed away at age of 93 nrp 97 | Loksatta

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

Mohandas Sukhtankar Passed Away : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते.

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

Mohandas Sukhtankar Passed Away : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ या भूमिकेत वावरले.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्यात नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यात गेले. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गोव्यातील माशेल आणि म्हापसा येथे झाले.

‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत दुसरीत शिकत असताना त्यांनी एका छोटया नाटकात काम केले होते. ‘खोडकर बंडू’असे त्या नाटकाचे नाव होते. या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘अरे तू नाहीतरी नुसता हुंदडत असतोस, मस्ती करतोस तर नाटकात काम कर’ असे शाळेतील आरोदेकर मास्तरांनी त्यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी ‘छे, छे हे नाटक-बिटक मला नाही जमायचे’ असे उत्तर मास्तरांना दिले होते. मात्र मास्तरांनी त्याचे तोंड रंगविले आणि अखेर त्यांनी त्या नाटकात काम करायला होकार दिला. तेव्हापासून मोहनदास सुखटणकर यांच्या तोंडाला कायमचा रंग लागला. यानंतर त्यांनी रंगभूमी हेच आपले दैवत मानले आणि नोकरी सांभाळून आयुष्यभर ‘कलावंत कार्यकर्ता’ म्हणून काम केले.

आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; ‘गांधी’सह ‘वास्तव’ चित्रपटात साकारल्या होत्या भूमिका

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकात त्यांनी स्त्रीपात्र सोडून बहुतांश भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी आतापर्यंत ४० ते ४५ नाटकात काम केले होते. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्याबरोबरच ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही ते झळकले.

त्याबरोबरच ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. तसेच ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही ते झळकले. पण टीव्हीवरील मालिका विश्वात ते फारसे रमले नाहीत. रंगभूमीवर कामाचा जिवंत अनुभव घेतल्यामुळे त्यांनी पुढे नाटकातच काम केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:15 IST
Next Story
पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटाबद्दल बोलला इशान खट्टर; म्हणाला, “भाऊ शाहिद कपूरने…”