आयुषमान खुराना व राजकुमार राव बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांनी केलेली डान्सची जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आयुषमान खुरानाचा ‘बाला’ हा चित्रपट सध्या तिकिटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. या चित्रपटाला मिळालेले मोठे यश साजरे करण्यासाठी निर्मात्यांनी एका खास पार्टिचे आयोजन केले होते. या पार्टित बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. या पार्टित आयुषमान व राजकुमारने जबरदस्त डान्स केला. दोघेही अक्षरश: बेभान होऊन नाचत होते. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘बाला’चा बोलबाला, पार केला १०० कोटींचा टप्पा

चित्रपट दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री’ सारखा भन्नाट विनोदी भयपट दिल्यानंतर ‘बाला’ हा अचूक मांडणी करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा कथाविषय असलेला ‘बाला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच हा चित्रपट तिकीटबारीबर चांगली कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने १००.१५ कोटींची कमाई केली आहे.