देशभरामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या काळात अनेक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये अडकून पडले आहेत. हजारो कामगार आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मिळेल त्या वाहानाने किंवा चालत आपल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न कामगार करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीने सोशल मीडियावर ११ वर्षांचा लहान मुलगा आई-वडिलांना घेऊन गावी परतत असल्याचा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ११ वर्षांच्या मुलाचा सायकल रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने त्या लहान मुलाला कुठे चालला आहे? कुठून आला आहेस? असे प्रश्न विचारले आहेत. त्यावर त्या मुलाने मी बनारसवरुन आलो आहे आणि आई वडिलांना घेऊन अररियाला चाललो आहे असे म्हटले आहे. बनारसमध्ये राहण्यासाठी घर नसल्यामुळे तो मुलगा गावी निघाला आहे. त्याच्यासोबत त्याचे आई-वडिल देखील असल्याचे दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. गुरूवारी दिवसभरात राज्यामध्ये १६०२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ वर पोहोचली आहे. दिलादायक बाब म्हणजे राज्यात सध्या २०,४४१ रुग्ण उपचार घेत असून, ६०५९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.