एकेकाळी संपूर्ण भारतात अतिशय लोकप्रिय असणारी मालिका ‘वागळे की दुनिया’ एका वेगळ्या रुपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आता तिन पिढ्या पाहायला मिळणार आहे. मराठमोळा अभिनेता सुमित राघवन या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका पुन्हा भेटीला येणार असल्याने चाहते आनंदी झाले आहे.

७० ते ८०च्या दशकात ‘वागळे की दुनिया’ ही मालिका दूरदर्शनवर प्रदर्शित झाली होती. त्यावेळी ही मालिका गाजली होती. त्या मालिकेत ‘वागळे’ हे पात्र अभिनेते अंजन श्रीवास्तव यांनी साकारले होते. आता ‘वागळे की दुनिया’ मालिकेत वागळे हे पात्र अंजन श्रीवास्तव साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री भारती आचरेकर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांच्या मुलाची भूमिका सुमीत राघवन साकारणार आहे.

नुकताच ‘वागळे की दुनिया’ या मालिकेचा टीझर प्रदर्शित झाला असून मालिकेत नवीन पिढीचे नवीन किस्से पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. ही मालिका सोनी सब वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

‘वागळे की दुनिया’ या मालिकेत एका मध्यमवर्गीय व्यक्तीची कथा मजेशीर अंदाजात दाखवण्यात आली होती. या व्यक्तीचे जीवन, दररोज सामोरे जावे लागत असलेल्या समस्या या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला होता. आता ही मालिका वेगळ्या अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.

या मालिकेविषयी बोलताना सुमीत राघवन म्हणाला, ‘७० ते ८०च्या दशकात ज्या मालिका प्रदर्शित झाल्या होत्या त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकांनी जणू काही प्रेक्षकांच्या मनावर जादूच केली होती. मी माझ्या पिढीविषयी बोलत आहे जे ७० ते ८०च्या दशकात जन्माला आले होते. तेव्हाची एक मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. १९८८मध्ये प्रदर्शित झालेली मालिकेचे नाव आहे वागळे की दुनिया. एक मध्यमवर्गीय जोडप्याची कथा मालिकेत दाखवण्यात आली होती. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्यांचा संघर्ष जो आपल्या जीवनाशी जोडला गेला होता.’

‘मी वागळे की दुनिया ही मालिका पाहिली होती. आता या मालिकेतील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. २०२१मध्ये वागळे की दुनिया ही मालिका तुमच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तीन पिढ्या दाखवण्यात येणार आहेत’ असे सुमीत पुढे म्हणाला.