पंकज त्रिपाठी हे नाव आता बॉलिवूडमध्ये परिचयाचं झालं आहे. ‘मसान’पासून ‘मिर्झापूर’पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पंकजने त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. मूळचा बिहारचा असलेल्या पंकजचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. पंकजने नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अभिनेता मनोज वाजपेयी व कवी कुमार विश्वाससुद्धा होते. मैत्रीचे किस्से सांगतानाच कपिलने या तिघांना त्यांच्याविषयीच्या काही अफवांविषयी विचारले. तेव्हा पंकजने त्याची पत्नी मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहायची ही अफवा खरी असल्याचं सांगितलं.

”लग्न केलं होतं तेव्हा माझ्याकडे तिला हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत ठेवण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. तिच्यामुळे हॉस्टेलमध्ये सर्वांनी पूर्ण कपडे घालायला सुरुवात केली. वहिनीसमोर शिस्तीत राहायचं म्हणून सर्वजण तो नियम पाळू लागले होते. पण जेव्हा हॉस्टेलच्या वॉर्डनला याबद्दल समजलं तेव्हा मला घर शोधावं लागलं,” असं पंकजने सांगितलं.

यावेळी पंकज व मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या मैत्रीचे रंजक किस्सेदेखील सांगितले. मनोज यांचे चप्पल त्यांचा आशीर्वाद समजून माझ्याजवळ ठेवला होता, अशी कबुली देताना पंकज यांचे डोळे पाणावले होते.