अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘सारे जहाँ से अच्छा’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र शाहरुखच्याही आधी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं या चित्रपटात काम करावं अशी सगळ्यांची इच्छा होती. आमिरनंही या बायोपिकसाठी होकार भरला मात्र ऐनवेळी या होकाराचं रुपांतर नकारात झालं. ही संधी आमिरनं का सोडली असा प्रश्न सगळ्यांनाच होता, यामागचं कारण आमिरनं नुकतच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘महाभारत’वर आधारित चित्रपट काढायचा हे आमिरचं स्वप्न आहे. या महत्त्वाकांक्षी प्रोजक्टमध्ये व्यग्र असल्यानं आमिरनं राकेश शर्मा यांच्या बायोपिकला नकार दिला असं त्यानं मान्य केलं. अंजूम राजाबाली यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ची कथा लिहिली जी आमिरला खूपच आवडली, मात्र त्यानं ऐनवेळी चित्रपट करण्यास नकार दिला. पण, आमिरनं शाहरूखचं नाव दिग्दर्शकांना सुचवलं. शाहरुखनंही कथा वाचून आणि आमिरच्या सल्ल्यावरून चित्रपटाला लगेच होकार भरला.

‘आरकेएफ प्रोडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या वर्षअखेरपर्यंत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट २०१९ पर्यंत प्रदर्शित होईल असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्यासाठी शक्यता आहे याआधी राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी भूमीऐवजी प्रियांका चोप्राचं नाव चर्चेत होतं.