महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विविध ठिकाणी सुमारे ३० कोटी इतक्या महाप्रचंड संख्येत मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. ऐतिहासिक आणि अमूल्य ठेवा असलेल्या मोडी लिपीतील या कोटय़वधी कागदपत्रांतील सुमारे एक लाख कागदपत्रे दरवर्षी नष्ट होत असल्याचा इतिहासकार व अभ्यासकांचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोडी भाषेतील ही कागदपत्रे अत्यंत जीर्ण झाली असून त्यावरील शाई पुसली जात आहे. या कागदपत्रांना वाळवी लागत असून कागदांचे पापुद्रे निघत आहेत. उंदीर, झुरळे यांच्याकडूनही ती कुरतडली जात आहेत, अशी माहिती मोडी भाषेचे अभ्यासक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे अध्यक्ष राजेश खिलारी यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.

भारतात तंजावर, बिकानेर, बेळगाव, बंगलोर, म्हैसूर, हैदराबाद येथे, तसेच महाराष्ट्रात पुण्यासह जिथे जिथे संस्थाने होती तेथे पेशवेकालीन, शिवकालीन, आंग्लकालीन आणि बहामनीकालीन अशा चार प्रकारांत मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगून खिलारी म्हणाले, संस्थात्मक व शासकीय पातळीवर ही कागदपत्रे जतन करण्याचे किंवा त्याचे मायक्रोफिल्मिंग करण्याचे काम सुरू आहे. मात्र फार मोठे आर्थिक पाठबळ नसल्याने व अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने या कामाला म्हणावा तितका वेग आलेला नाही.

आपल्याकडे मोडी लिपी विशेषज्ञांची संख्या अवघी दहा इतकी आहे. मोडी लिपीचे तज्ज्ञ २५ तर किरकोळ मोडी जाणणारे सुमारे १२५ आहेत. पण एकूण उपलब्ध कागदपत्रांच्या तुलनेत ही संख्या खूपच अपुरी आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारांतील मोडी कागदपत्रे वाचू शकणारे किमान एक हजार उत्तम वाचक निर्माण झाले आणि त्या प्रत्येकाने दररोज किमान एक कागद वाचायचा ठरवला तरी हे काम किती कठीण आहे, हे लक्षात येईल, याकडेही खिलारी यांनी लक्ष वेधले.

देशातील प्रत्येक विद्यापीठातून इतिहास विषय, तसेच ‘एम.ए’-भाग एक आणि दोन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान काही गुणांचा तरी हा विषय ठेवला पाहिजे. राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमधून शिक्षकांना मोडी लिपी शिकणे सक्तीचे आणि विद्यार्थ्यांना ऐच्छिक केले जावे, मोडी लिपी आणि भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी वर्षांतून एखादा दिवस ‘मोडी दिन’ म्हणून राज्य शासनातर्फे साजरा केला जावा, अशी अपेक्षाही खिलारी यांनी व्यक्त केली.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 million modi lipi documents destroyed every year