१५ जानेवारीला मुंबईत सहभाग

मुंबईत येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये मूळचे नाशिकच्या मालेगावचे रहिवासी असलेले १०३ वर्षांचे दगडू भामरे हे वयोवृद्ध आजोबाही धावणार आहेत.

‘स्टँडर्ड चार्टर्ड’तर्फे आयोजित होणाऱ्या मॅरेथॉनचे हे १४वे वर्ष आहे. लहानांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांचा या मॅरेथॉनमध्ये सहभाग असतो. यात यंदा १०३ वर्षांचे भामरे सहभागी होणार आहेत. भामरे हे या मॅरेथॉनमध्ये धावणारे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. मॅरेथॉनमध्ये धावण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. अजूनही ठणठणीत असलेले दगडू भामरे हे मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी खूपच उत्सुक असतात. दिवसातून साधारण ४.३ किलोमीटर ते चालतात आणि इतकेच नाही तर आठवडय़ातून दोन वेळा ४ ते ५ किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांनी स्वतच्या शरीराला हा नियमच घालून घेतला आहे.

[jwplayer wjX72vFl]

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांकडून प्रेरणा

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांकडून मला ही प्रेरणा मिळाली, असे दगडू भामरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. धावण्यामुळे शरीरस्वास्थ्य चांगले राहते हे नमूद करायला देखील ते विसरले नाहीत. तरुण मुलांपासून प्रत्येकाने रोज धावायला हवे, असेही त्यांनी सांगितले. भामरे स्वत पूर्ण शाकाहारी असून रोज आपल्या आहारात पुरेसे प्रोटीन, कॅल्शियम आणि दूध आणि फळांचा समावेश करतात. योग्य आहार व व्यायामामुळे प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. म्हणूनच वयाच्या १०३व्या वर्षीदेखील भामरे ठणठणीत आहेत.

[jwplayer z7sroXvD]