अद्यापही रेल्वेचे १८ लाख प्रवासी कमी ; करोनामुळे झालेले स्थलांतर, खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’सह अन्य कारणे

पूर्वी दररोज ७९ लाख ते ८० लाखांच्या दरम्यान प्रवासी संख्या होती. आता ६१ लाख ४६ हजार प्रवासी संख्या झाली आहे.

मुंबई : करोनाकाळात झालेले स्थलांतर, अद्यापही काही खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील प्रवासी संख्या ही करोनाच्या साथीपूर्वीपेक्षा १८ लाखांनी कमी झाल्याचे दिसत आहे.

करोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू झाली. सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी जून २०२० पासून लोकल सुरू झाल्या. त्यानंतर निर्बंध लागू करून काही प्रमाणात सामान्य प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल होताच लोकल प्रवासी संख्या वाढू लागली. परंतु अद्याप करोना साथीपूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा सध्याची प्रवासी संख्या कमी आहे.

पूर्वी दररोज ७९ लाख ते ८० लाखांच्या दरम्यान प्रवासी संख्या होती. आता ६१ लाख ४६ हजार प्रवासी संख्या झाली आहे. पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरून मार्च २०२० पूर्वी दररोज ३४ लाख ७८ हजार प्रवासी प्रवास करत होते. आता हीच संख्या २५ लाख ४६ हजार झाली आहे.

मध्य रेल्वेवरही आधी ४५ लाख असलेली प्रवासी संख्या सध्या ३६ लाखांपर्यंत घटली आहे.  कारणे काय? परराज्यांतून मुंबईत कामधंद्यानिमित्त आलेल्या लोकांनी करोनाकाळात पुन्हा परराज्यात स्थलांतर केल्याची शक्यता रेल्वेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. काही मोठय़ा खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अद्यापही घरातून काम करण्याची मुभा आहे. याशिवाय करोना साथीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आल्याने खासगी वाहने विकत घेण्याचे प्रमाणही वाढले. खासगी प्रवासी बस, अ‍ॅप आधारित वाहन सेवा असे पर्याय निवडण्याकडेही कल वाढल्याचे दिसत आहे.  प्रवासी अद्याप कमी असण्याची अनेक कारणे असू शकतात. ठोस कारणे सांगणे कठीण आहे. परंतु प्रवासी संख्या पूर्वीपेक्षा कमी आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

सध्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज १ हजार ८१० लोकल फेऱ्या होत आहेत. पश्चिम रेल्वेवर फेऱ्यांची संख्या १ हजार ३७५ झाली आहे. या दोन्ही मार्गावर वातानुकूलित फेऱ्यांचीही भर पडल्यामुळे फेऱ्यांमध्ये वाढ झाली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 18 lakh local passengers reduce on central and western railway route zws

Next Story
स्पर्धा परीक्षेतील यशाचा मूलमंत्र; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये डॉ.  रवींद्र शिसवे यांचे मार्गदर्शन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी