मुंबई : रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची एका भामट्याने तीन लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत पार्कसाईट पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
सुरेश आसारी (३५) असे आरोपीचे नाव असून तो मानखुर्द परिसरातील वास्तव्यास आहे. विक्रोळी परिसरात राहणाऱ्या धनश्री वायगंकर यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्यासाठी सुरेशने दहा लाख रुपयांची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी त्याने यापैकी तीन लाख रुपये घेतले होते. त्यानंतर सुरेशने त्याला तिकीट तपासनीस पदाचे रेल्वेचे बनावट नियुक्ती पत्रही दिले. मात्र हे पत्र बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. हा आरोपी मंगळवारी चुनाभट्टी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.