भिवंडी येथील अरिहंत कंपाऊंडमधील दुमजली इमारत बुधवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.  या दुर्घटनेत २६ जण जखमी झाले होते. ठाणे जिल्ह्य़ामध्ये इमारत कोसळून अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.
इमारतीचा ढिगारा हटविताना गुरुवारी रात्री दोन मृतदेह सापडले होते. शुक्रवारी सकाळी याच ठिकाणी आणखी मृतदेह मिळाला. इमारत पडल्यानंतर त्यावेळीच तीन मृतदेह मिळाले होते.
भिवंडी येथील कोपर गावाच्या हद्दीमध्ये अरिहंत कंपाऊंड असून त्यामध्ये संजय नेमचंद देढिया (रा. वर्सोवा) यांचा कपडे तयार करण्याचा कारखाना आहे. बुधवारी मध्यरात्री, या कारखान्यामध्ये ४० ते ४५ कामगार शिलाईचे काम करीत होते. त्यावेळी कारखान्याची इमारत कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले. त्यानंतर जिल्ह्य़ाचे आपत्कालीन व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, पोलीस, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अडथळे येऊ लागले. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचरण करण्यात आले. या पथकाने ४२ कामगारांचे प्राण वाचविले. या अपघातात २६ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.