मुंबईः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील केवळ चार टक्के प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरले आहेत. जानेवारी २०१८ ते जुलै २०२३ या कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेत सुमारे ५९४ गुन्हे दाखल झाल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त माहितीतून स्पष्ट झाले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल ५९४ गुन्ह्यांपैकी २६४ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून त्यात आरोपत्र अथवा गुन्ह्याचा तपास बंद केल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. म्हणजेच निम्याहून अधिक प्रकरणे अद्यापही तपासाधीन असल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या ढिसाळपणामुळे प्रवासी मेटाकुटीला; रोजच्या ७० फेऱ्या रद्द, शेकडो लोकल विलंबाने

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या ५९४ प्रकरणांमध्ये ५९ हजार ७५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या रकमेचा हा आकडा खूप मोठा आहे. तसेच १ जानेवारी २०१८ ते जुलै २०२३ या कालावधीत तब्बल ३१९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर केवळ १४ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. त्यामुळे दोष सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ चार टक्के आहे. त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांतील ९३ आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

व्हाइट कॉलर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत सुधारणा आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात आरोपी निर्दोष सुटत असल्यामुळे याबाबत चौकशी होण्याची गरज असल्याचे द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितले. घाडगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त माहितीत हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

एक टक्का रक्कमही परत नाही…

मुंबईत साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असताना केवळ ३७ कोटी २४ लाख ८१ हजार २१४ एवढी रक्कमच तक्रारदारांना परत करण्यात आली. फसवणूक झालेल्या ५९ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत तक्रारदाराला परत मिळालेली रक्कम एक टक्काही नाही.

हेही वाचा – मुंबई : राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन, ४ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल

या वर्षात सुमारे दोन हजार कोटींची फसवणूक

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ४६ गुन्ह्यांंची नोंद केली आहे. त्यात सुमारे १९९६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे मुंबई पोलिसांच्या आकेडवारीतून स्पष्ट होत आहे. त्यापैकी सर्व गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. गेल्यावर्षी याच काळात १४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती.