मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी नाका टप्पा २ अचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. बीकेसी – आचार्य अत्रे चौक मार्गिका शनिवारी सकाळी ६.३० वाजता वाहतूक सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना आरे – वरळी नाका असा थेट अतिजलद आणि गारेगार प्रवास करता येणार आहे.
आरे – वरळी नाका दरम्यान रस्ते मार्गे प्रवास करण्यासाठी किमान सव्वा ते दीड तास अवधी लागतो. गर्दीच्या वेळी हा अवधी आणखी वाढतो. पण आता मात्र भुयारी मेट्रोच्या माध्यमातून हा प्रवास केवळ ३६ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र आरे – आचार्य अत्रे चौक दरम्यान अतिजलद प्रवासासाठी मुंबईकरांना ६० रुपये मोजावे लागतील.मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानची १२.६९ किमी लांबीची मार्गिकेचे ऑक्टोबर २०२४ पासून संचलन सुरू आहे. आता बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा २ अचे काम पूर्ण करून, या टप्प्यासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे. आता या टप्प्याचे लोकार्पणही करण्यात आले आहे.
९.७७ किमी लांबीचा, सहा मेट्रो स्थानकांचा समावेश असलेला हा टप्पा शनिवारपासून वाहतूक सेवेत दाखल होत आहे. शनिवारी सकाळी ६.३० वाजता आरे – आचार्य अत्रे चौक मार्गिकेचे संचलन सुरू होणार आहे. त्यानुसार आरे मेट्रो स्थानकावरून आचार्य अत्रे चौकसाठी पहिली मेट्रो गाडी, तसेच आचार्य अत्रे चौक मार्गावरून आरेसाठी पहिली मेट्रो गाडी सकाळी ६.३० वाजता सुटेल. आता मेट्रो ३ मार्गिकेतील अंदाजे २३ किमीची मार्गिका वाहतूक सेवेत दाखल असणार असून प्रवाशांना आता आरे, सांताक्रूझ, बीकेसी येथून धारावी, दादर, शितलादेवी, सिद्धीविनायक मंदिर आणि वरळी नाक्यावर अवघ्या काही मिनिटांत पोहचता येणार आहे. ही मेट्रो गाडी चक्क मिठीनदीच्या खालून जाणार आहे हे विशेष.
२४४ फेऱ्या
आरे – बीकेसी मार्गिकेदरम्यान मेट्रो गाड्यांच्या दररोज २६० फेऱ्या होत होत्या. आता मात्र आरे – आचार्य अत्रे चौक स्थानकादरम्यान मेट्रोच्या फेऱ्या होणार असून या फेऱ्यांची एकूण संख्या २४४ असेल, अशी माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. आरे – बीकेसीदरम्यान १० मेट्रो गाड्या धावत होत्या. पण आता मात्र आरे – आचार्य अत्रे चौकदरम्यान एकूण १८ मेट्रो गाड्या धावणार आहेत. तर या गाड्यांची वारंवारता ६ मिनिटे २० सेंकद अशी असणार आहे. एकूणच आता आरे – आचार्य अत्रे चौक अशी भुयारी मेट्रो कार्यान्वित होत आहे.
तिकीट दर असे
तिकीट दर किमान १० रुपेय, तर कमाल ६० रुपये
आरे – सीप्झ – १० रुपये
आरे – एमआयडीसी,अंधेरी – २० रुपये
आरे – मरोळनाका – २० रुपये
आरे – विमानतळ टर्मिनल २ – ३० रुपये
आरे – सहाररोड – ३० रुपये
आरे – विमानतळ टर्मिनल१ – ३० रुपये
आरे – सांताक्रुझ – ४० रुपये
आरे – वांद्रे वसाहत – ४० रुपये
आरे – बीकेसी – ५० रुपये
आरे – धारावी – ५० रुपये
आरे – शितलादेवी – ५० रुपये
आरे – दादर – ६० रुपये
आरे – सिद्धीविनायक – ६०रुपयेआरे – वरळी – ६० रुपयेआरे – आचार्य अत्रे चौक – ६० रुपयेबीकेसी – आचार्य अत्रे चौक – ४० रुपये