मुंबई : राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून वादाची ठिणगी पडली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, असे शालेय शिक्षण विभागाने एका शासन शुद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया समोर येत आहेत. हिंदी भाषेच्या निर्णयावर मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे याने भाष्य करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध ! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय ? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही? असे प्रश्न ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर एक पोस्ट करीत हेमंत ढोमे याने उपस्थित केले आहेत.
‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणाप्रमाणे असेल, असे शालेय शिक्षण विभागाने १७ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन शुद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ‘हिंदी सक्ती मागे घेतली असे वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा शासन निर्णय वाचा. हिंदी ही तृतीय भाषा असेल. ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल, त्यासाठी किमान २० इच्छुक विद्यार्थी हवेत. हा काय नियम आहे ? म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितले आहे. पहिल्या इयत्तेतील मेंदूला किती ताण देणार ? आणि का ? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही ? एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर… पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध ! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय ? असे म्हणत हेमंत ढोमे याने संताप व्यक्त केला आहे.
शासन शुद्धिपत्रकात नेमके काय ? सविस्तर वाचा…
‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि, हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील. हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाइन पध्दतीने शिकविण्यात येईल. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल, असे शालेय शिक्षण विभागाने शासन शुद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे.