घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत राहणाऱ्या भार्गवी नरेश दुपारे (वय १९) या तरुणीचा पाच महिन्यांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मात्र पाच महिन्यांनंतरदेखील पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल न केल्याने बुधवारी तिच्या नातेवाईकांनी रमाबाई कॉलनी येथे पोलिसांविरोधात निदर्शने केली.

जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीची १३ जूनला अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला घाटकोपरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना या तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने, तिची प्रकृती अधिकच बिघडली आणि यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी त्या वेळीदेखील तिच्या नातेवाईकांनी केली होती. मात्र  पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी आंदोलन केले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.