प्राणिमित्र संघटना सरसावल्या खाडीलगतच्या भागात पक्षी जखमी होण्याची पाचवी घटना

नालासोपारा येथील खाडीलगतच्या भागात कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या फ्लेमिंगोला ‘रॉ’ या प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. या पक्ष्याच्या पंखाला इजा झाली असून उपचारांनंतर तात्काळ उडू शकत नसल्याने उपचारासाठी त्याला वांद्रे येथील डॉ. रिना देव यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. शहरातील खाडीलगतच्या भागात फ्लेमिंगो जखमी होण्याची ही पाचवी घटना आहे.

मुंबईतील खाडीलगतच्या भागात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो स्थलांतर करतात. कुत्रे किंवा शिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात फ्लेमिंगो जखमी होतात. नालासोपारा येथील खाडीलगतच्या भागात जखमी झालेल्या एका फ्लेमिंगोला वाचविण्यात ‘रॉ’ या प्राणिमित्र संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांना यश आले. कुत्र्याने केलेल्या हल्ल्याने फ्लेमिंगोच्या पंखाला इजा झाली होती. हा फ्लेमिंगो स्थानिक मच्छीमार सुनील डावरे आणि समीर शेलार यांच्या नजरेस पडला. त्यांनी जखमी फ्लेमिंगोला स्थानिक प्राणिमित्र सचिन माईन यांच्या मदतीने ‘रॉ’च्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले.

कार्यकर्त्यांनी या फ्लेमिंगोला वांद्रे येथील प्राण्यांच्या डॉक्टर रिना देव यांच्या दवाखान्यात उपाचारांसाठी दाखल केले. उपचारानंतर फ्लेमिंगोला ताबडतोब उडणे शक्य नसल्याने आणखी काही दिवस त्याला दवाखान्यातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘रॉ’चे प्रमुख पवन शर्मा यांनी दिली. तसेच या घटनेची माहिती वनविभागाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये फ्लेमिंगोंची शिकार करण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ‘पिंक चिकन’ अथवा लाल बगळ्याचे मटण या स्थानिक नावांनी याची मांस विक्री केली जात असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. फ्लेमिंगो हे थव्याने प्रवास करीत असतात. जखमी फ्लेमिंगो उडण्यायोग्य झाल्यावर त्याला फ्लेमिंगोच्या थव्यांमध्ये सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.