‘राणीच्या बागे’तील प्राण्यांची खाणे-पिणे, स्वच्छतेची बडदास्त; अभिरक्षकासह अनेक कर्मचाऱ्यांचा उद्यानातच मुक्काम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : ठरावीक वेळेत ठरावीक ठिकाणी विहार करू शकणारे ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’तील (राणीची बाग) प्राणी एरव्हीपेक्षा जास्त वेळ मुक्त संचाराचा आनंद घेऊ  शकत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची, स्वच्छतेची सगळी बडदास्त इथल्या अभिरक्षकांनी आणि पशुपालकांनी ठेवली आहे. त्यामुळे हे प्राणी नेहमीसारखेच ताजेतवाने आहेत. त्यासाठी पशुपालकांनी उद्यानातच मुक्काम केला आहे.

राणीच्या बागेतील अभिरक्षक हे स्वत: डॉक्टर आहेत. त्यामुळे जगभर घोंघावणाऱ्या करोना वादळाचे परिणाम भविष्यात राणीच्या बागेवरही होतील याची कल्पना त्यांना होतीच. त्यामुळे टाळेबंदीत त्यांनी बागेतील बंगल्यातच मुक्काम करण्याचा पर्याय स्वीकारला. एरव्हीही ते काळजी घेत असलेल्या प्राण्यांसाठी आता त्यांना अधिक वेळ देता येत आहे. त्यांच्यातील बदल टिपणे, संशोधन करणे असेही काम सध्या बागेत सुरू आहे. प्राण्यांप्रमाणेच येथील झाडांची काळजी घेणारा कर्मचारी वर्गही उद्यानातच राहात आहे. सध्या उद्यानातील फुलझाडे बहरली आहेत. नियमित कापणी, खतपाणी करून त्यांचे सौंदर्य कायम राखले जात आहे.

काळजी कशी घेतली जाते?

टाळेबंदीची कल्पना आल्यावर प्रशासनाने सर्वप्रथम पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेची शीतकपाटे (डीप फ्रीझर) खरेदी करून प्राण्यांच्या खाद्याचा साठा करून ठेवला. एरव्ही प्राण्यांसाठी रोज मांस पुरवले जाते. टाळेबंदीमुळे वीस-वीस दिवसांचा साठा करून ठेवला जात आहे. रोज सकाळी प्राण्यांना आंघोळ घालण्याचे काम पशुपालक करतात. हत्तीच्या तर संपूर्ण शरीराला मालीश केली जाते. आंघोळी आणि त्यानंतर मिळणारा पुरेसा आहार प्राण्यांचा उत्साह वाढवतो. प्राण्यांमधील अन्न  शोधण्याची नैसर्गिक वृत्ती कायम राहावी याचीही काळजी पशुपालक घेतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अन्न लपवून ठेवले जाते. यामुळे प्राणी स्वत:हून अन्न शोधण्यास प्रवृत्त होतात.

बिनधास्त वावर

उद्यान सुरू असताना प्राण्यांनाही दिवसभराचे वेळापत्रक अंगवळणी पडलेले असते. खाणे कधी, बघण्यासाठी माणसे केव्हा येणार याची सवय त्यांना झालेली आहे. पशुपालक कोणत्या वेळी काय करायला सांगतात ते त्यांना कळलेले आहे. गर्दी झाली की बुजरे प्राणी आडोसा शोधतात. एरव्ही गर्दी दिसली की माकडे उत्साहाने पिंजऱ्याच्या काचेजवळ येतात. पण हरणे मात्र गर्दीला घाबरतात. सध्या मात्र गर्दी नसल्याने प्राणी बिनधास्त वावरत आहेत. प्राण्यांच्या वर्तणुकीतील बदलाचा अभ्यास सध्या उद्यानातील अभिरक्षक आणि जीवशास्त्रज्ञ करत आहेत.

मी लालबागवरून उद्यानापर्यंत चालत जातो. सार्वजनिक वाहनाने प्रवास करतानाचा धोका टाळता येईल. उद्यानात स्वत:ला निर्जंतुक केल्याशिवाय प्राण्यांच्या जवळ कुणीही जात नाही. उद्यानात गर्दी नसल्याने प्राण्यांच्या वर्तणुकीत बदल झाला आहे.

– अभिषेक साटम, जीवशास्त्रज्ञ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animals of rani baug to get hygiene food and drink zws