जगातील सर्वात मोठी कंपनी अ‍ॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज आत्मसुखाच्या शोधार्थ १९७०मध्ये भारतात दाखल झाले होते. त्यानंतर तब्बल चार दशकांनंतर कंपनीत त्यांचे पद भूषवणारे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक जगातील सर्वात मोठय़ा बाजारपेठेत पाय घट्ट रोवण्यासाठी भारतात दाखल झाले. जलदगती दूसंचार सेवा हा भारतातील अ‍ॅपलच्या यशाचा पाया असेल असे मानणाऱ्या कुक यांनी बुधवारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन भारत दौऱ्याला सुरुवात केली. या वेळी त्यांच्यासोबत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानीही होते.
भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अ‍ॅपल बंगळुरू येथे आयओएस अ‍ॅप रचना आणि विकास केंद्र सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयओएससाठी काम करणाऱ्या समूह देशांतील भारत हा आश्वासक देश आहे. यामुळे येथील आयओएस विकासकांना जगभरातील लोकांना उपयुक्त असे अ‍ॅप विकसित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. हे केंद्र २०१७च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रामुळे भारतातील अ‍ॅपल अ‍ॅप विकासकांना अभियंत्यांना प्रोत्साहन मिळणार असून भारतीय आयओएस समूह अधिक मोठा होईल असेही कंपनीने पत्रकात नमूद केले आहे. या केंद्रात विकासकांना मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीचे तज्ज्ञही नेमण्यात येणार आहे. यामुळे आयओएस, मॅक, अ‍ॅपल टीव्ही आणि अ‍ॅपल वॉच यासाठी अ‍ॅप विकसित करणे सोपे होईल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. कुक यांच्या या निर्णयाचा भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात स्वागत होत असून या केंद्रामुळे देशातील आओएस अ‍ॅप विकासकांना मोठी संधी निर्माण होईल अशी अशा व्यक्त होत आहे. अ‍ॅपलच्या बंगळुरूमधील केंद्रामुळे देशातील बुद्धिमान लोकांना संधी मिळणार असल्याची आशा नॅसकॉमतर्फेही व्यक्त करण्यात आली आहे. कुक आपल्या भारत दौऱ्यात नेमके कोणाला भेटणार आहेत किंवा त्यांचा काय कार्यक्रम असणार आहे याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. मात्र बुधवारी त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या मुख्यालयाला भेट दिली तर अभिनेता शाहरुख खान याचीही भेट घेतली. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.