आर्थिक संकटातील कोहिनूर समूहाच्या मध्य मुंबईतील मोक्याच्या मालमत्तांची विक्री प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. समूहाला कर्ज देणाऱ्या तीन सरकारी बँकांनी ६७.६४ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसाठी येत्या महिन्यात ई-लिलाव करण्याचे जाहीर केले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी संबंधित कोहिनूर समूहाच्या कुर्ला (पश्चिम) परिसरात मोकळ्या भूखंडासह विविध मालमत्ता आहेत. समूहातील शैक्षणिक संस्था, आदरातिथ्य व स्थावर मालमत्ता कंपनीमार्फत साकारणाऱ्या प्रकल्पासाठी बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक व बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ६७,६४,००,२८८.३८ रुपये आहे. यामध्ये वार्षिक १८.४५ टक्के दराने आकारण्यात येणाऱ्या व्याजाचाही समावेश आहे. या मालमत्तांसाठी जोशी यांचे पुत्र उन्मेश, स्नुषा माधवी व पत्नी अनघा हे हमीदार आहेत. समूहाने या तीन बँकांचे जानेवारी २०१७ पासून कर्ज थकविले आहे.
याबाबत तीनही बँकांनी एकत्रितरित्या लिलाव प्रक्रिया सुरू केली असून याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने स्पष्ट केल्यानुसार, १२,५०० चौरस मीटर जागा व मालमत्ता असलेल्या परिसराचा येत्या ७ डिसेंबर रोजी ई-लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाकरिता इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन करतानाच बोलीकरिता ८२.३४ लाख कोटी रुपये राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे. मालमत्ता पाहणीकरिता १६ नोव्हेंबरचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
समूहाने घेतलेल्या कर्जापैकी सर्वाधिक रक्कम ही स्टेट बँकेची असून जानेवारी २०१७ पासून ती थकविण्यात आली आहे. तर बँक ऑफ इंडियाचे कर्ज त्याच वर्षांत, मेपासून थकित आहे. काही मालमत्तांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज लागू नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
