पालिकेच्या प्रस्तावित आरोग्य विद्यापीठाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी सेनेचे नगरसेवक करीत असतानाच युतीतील भागीदार भाजपने मात्र बोरिवली येथे दोन भूखंडांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईतील सर्वात मोठे क्रीडा संकुल उभारून त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णयही घेऊन टाकला आहे. या उपक्रमासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित असून राज्य शासनाने २४ कोटींची तरतूद केली आहे तर उर्वरित खर्च महापालिका करणार आहे.
बोरिवलीच्या शिंपोली येथे जवळपास १५ एकर भूखंडावर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी तसेच त्या शेजारील महावीरनगर येथील १३ एकरावर मुंबई विभागीय क्रीडा संकुल बनविण्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार गोपाळ शेट्टी गेली तीन वर्षे म्हाडा, राज्य शासन व पालिकेकडे पाठपुरावा करत होते. हे क्रीडा संकुल उभारण्याचा ठराव महापालिका सभागृहात तीन वर्षांपूर्वीच एकमताने मंजूर झाला होता. तसेच दोन वर्षांपूर्वी या भूखंडाला संरक्षक भिंत बांधण्याचा ठरावही मंजूर झाला होता. यातील एक भूखंड पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे  म्हाडाच्या ताब्यात गेला होता. मात्र राज्य व केंद्राच्या क्रीडाधोरणाचा आधार घेत गोपाळ शेट्टी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून म्हाडाकडील भूखंड पालिकेच्या अखत्यारित आणला. 
राज्य शासनाकडून भूखंड विकासासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद त्यांनी करून घेतली. यातील १५ एकरवरील संकुलाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे. दरम्यानच्या काळात संरक्षक भिंत उभारण्यासाठी पैसे देण्यास पालिकेने टाळाटाळ सुरु केल्यामुळे आमदार शेट्टी यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आणि आयुक्तांसह सदर जागांची पाहाणीही करून घेतली आहे. गणेशोत्सवानंतर १३ एकरावरील भूखंडावर काम सुरू होणार आहे. या दोन्ही संकुलांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी भूमिका गोपळ शेट्टी यांनी घेतली. क्रीडाप्रेमी बाळासाहेबांचे हे एक आगळे वेगळे स्मारक ठरेल असे, गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.या दोन्ही संकुलांमध्ये फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, व्यायामशाळा , व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, चारशे मीटरचा धावण्याचा ट्रॅक तसेच तरण तलाव निर्माण करण्याचा मानस असल्याचेही आमदार शेट्टी म्हणाले.  
असे असेल संकुल
*   १३ एकरावर उभे राहणार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल
*   २५ हजार नागरिकांना होणार लाभ
*  शंभर कोटींचा खर्च
  संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित  
 बाळासाहेबांच्या नावे भव्य क्रीडा संकुल!
पालिकेच्या प्रस्तावित आरोग्य विद्यापीठाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी सेनेचे नगरसेवक करीत असतानाच युतीतील भागीदार भाजपने मात्र बोरिवली येथे दोन भूखंडांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईतील सर्वात मोठे क्रीडा संकुल उभारून त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णयही घेऊन टाकला आहे.
  First published on:  25-01-2013 at 03:29 IST  
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackerays name for big sports complex at andheri