पैसा, प्रतिष्ठा, सुख आणि समुद्धीसाठी मुंबईसारख्या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारी माणसे तशी नित्याचीच. मात्र सध्या मुंबईत लोक येत आहेत ते घोटभर पाणी पिण्यासाठी. किमान चार दिवस तरी मुबलक पाणी पिता यावे या उद्देशाने दुष्काळग्रस्त जिल्हा बीडहून प्रदर्शनात दुकान थाटायच्या निमित्ताने महिला बचत गटातील मंडळी दाखल झाली आहेत.
ग्रामीण भागातील महिला कारागिरांसाठी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी एकूण ४० महिला शेकडो किलोमीटरचा लांब पल्लय़ाचा प्रवास करून काही पैशांसह पिण्याच्या पाण्याची सोय होईल, या आशेने वांद्रे रेक्लेमेशनच्या म्हाडा मैदानावर दाखल झाल्या आहेत. परंतु प्रदर्शनाच्या चार दिवसांनंतर डोळ्यात पाणी घेऊन परतावे लागण्याचे कटू सत्यही त्या सांगत आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजक कौशल्यनिर्माण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या ‘ग्राम विकास व पंचायत राज्य विभागा’तर्फे सलग तेराव्या वर्षी ‘महालक्ष्मी सरस-२०१६’ हे प्रदर्शन १६ ते २८ जानेवारी या कालावधीसाठी भरविण्यात आले आहे. यात राज्यभरातील ४०० हून अधिक ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे आदीं प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्य़ावर दुष्काळाचे संकट कोसळले असतानाही जगण्याची उमेद, स्वप्न आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल, या अपेक्षेत काही महिला छोटय़ाछोटय़ा खेडय़ांतून या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
‘पाण्यासाठी दाही दिशा’ अशी अवस्था असलेल्या या महिला मुंबईतला मुबलक पाणीपुरवठा पाहून चकित झाल्या आहेत. ‘आमच्या गावात १५ दिवसांतून एकदा पाणी मिळते. तेही नक्की मिळेल याची शाश्वती नाही. अनेकदा एक हंडा पाणी मिळावे यासाठी रात्रभर रांगेत उभे राहवे लागते. त्यामुळे अर्धा ग्लास पाणी फेकण्याचा विचारही आम्हाला परवडणारा नाही. मुंबईत मात्र पुष्कळ पाणी आहे, असे आम्हाला कळले होते. त्यामुळे चार दिवस का होईना, आम्हाला पाणी प्यायला मिळेल या अपेक्षेने आम्ही इथे आलो आहोत. मात्र गेल्या चार दिवसांपासून इथे काही लोक सर्रास पाणी फेकून देताना दिसतात. त्यावेळी आम्हाला आमची पाण्यासाठी तहानलेली मुले आठवून डोळ्यात पाणी येते’, असे बीड जिल्ह्य़ातील घोडका राजुरी या खेडय़ातून आलेल्या संजीवनी पवार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत पाणी प्यायला मिळण्याचे समाधान
आम्ही अडीच एकरमध्ये कापूस लावला होता. यातून २० क्विंटल कापूस अपेक्षित असतो. मात्र त्यातून केवळ १५ किलो कापूस हाती लागला आहे. तोच विकण्यासाठी इथे आलो आहे. मात्र अद्याप फार विक्री झाली नाही. पण मुंबईत पाणी प्यायला मिळत आहे. याचे समाधान आहे, असल्याचे बीड जिल्ह्य़ातील संजीवनी साळवे यांनी सांगितले.
आमच्यासह जनावरांचेही हाल
दुष्काळामुळे शेती जळून गेली. पाणी नसल्यामुळे आमच्यासकट जनावरांचेही हाल होत आहेत. सध्या गावाला आम्ही महिला प्रात:विधीसाठी कपडे पिळून उरलेले पाणी वापरतो. सध्या येथे या प्रदर्शनानिमित्त पाणी वापरायला मिळत आहे. मात्र चार दिवसानंतर माघारी परतावेच लागणार असल्याचे बीड जिल्ह्य़ातील माधळमुही गावातील विजया मोहिते यांनी सांगितले.
माल विक्री झाली नाही तर..
अनेक लोकांनी कर्ज काढून माल विकत घेतला आहे. मुंबईत आल्यावर चार पैसे मिळतील अशी आशा होती. पण अद्याप मालाची विक्रीच झाली नाही. त्यामुळे लोकांनी जर माल विकत घेतला नाही, तर मोठे संकट कोसळणार असल्याचे गोकुळ डिसले यांनी सांगितले.
एकाच स्टॉलमध्ये दोघांना जागेमुळे अडचण
आम्ही राज्य सरकाचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र एकाच स्टॉलमध्ये दोघांना जागा दिल्याने दोघांचीही अडचण होत असल्याचे मीना पाटील यांनी सांगितले.
मुंबईकरांनी पाणी वाया घालवू नये
मी तर अडाणीबाई सल्ला काय देणार? पण आमच्या गावात नळाची तोटी किंचित जरी उघडी राहिली तरी पाणी वाया जाईल याचा विचार केला जातो. त्यामुळे हाच विचार मुंबईतील लोकांनीही करावा, असा सल्ला लोदळगावच्या गोदावरी कांबळे या ज्येष्ठ महिलेने दिला. या बाईंना अडाणी म्हणावे तरी कसे असा प्रश्न पडतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed womens came in mumbai for water